करंजाडे ग्रामपंचायत हद्दीमध्ये दारुबंदी
नवीन पनवेल : पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत करंजाडे हद्दीमध्ये दारुबंदी लागू करण्यासाठीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी-रायगड यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी-जिल्हा परिषद, तहसीलदार-पनवेल, गटविकास अधिकारी-पनवेल यांना देखील अवगत करण्यात आले आहे.
करंजाडे ग्रामपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी दारु विक्री होत आहे. त्यामुळे येथील तरुण मंडळी दारुच्या आहारी जाऊन नवजात पिढी व्यसनाधीन होत आहे. तसेच गावातील दारु विक्रीमुळे बऱ्याचशा महिलांचे संसार उध्वस्त झाले आहेत. याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार अर्ज दाखल आहेत.
करंजाडे वसाहतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ रस्त्याशेजारी वाईन शॉप असल्याने रस्त्यावर येजा करणाऱ्या महिलांना त्याचा त्रास होत आहे. तसेच येथे थांबणाऱ्या वाहनांमुळे देखील वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे अपघात आणि चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत. तसेच वाईन शॉपच्या १०० मीटर क्षेत्रफळाच्या आत शाळा आहे. या वाईन शॉपमुळे शाळेतील मुलांवर त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने करंजाडे ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत हद्दीमध्ये दारुबंदी लागू करण्याबाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे, अशी माहिती सरपंच मंगेश तानाजी शेलार, उपसरपंच सागर आंग्रे आणि ग्रामविकास अधिकारी सुदिन धनाजी पाटील यांनी दिली.
करंजाडे शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच वाईन शॉप आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होते. महिलांना याचा त्रास होत आहे. संपूर्ण करंजाडे मध्ये दारुबंदी करण्यासाठी सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे.
-मंगेश शेलार, सरपंच-करंजाडे ग्रामपंचायत.