डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजनासाठी बैठक
डोंबिवली : डोंबिवली शहरातील ‘एमएमआरडीए'कडून सुरु असलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यबाबत आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या दालनात ६ डिसेंबर रोजी बैठक पार पडली. या बैठकीत आमदार रवींद्र चव्हाण यांनी देखील व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे मार्गदर्शन केले. आमदार चव्हाण यांनी वाहतूककोंडी कमी करण्यासाठी महापालिका प्रशासन, पोलीस वाहतूक शाखा आणि एमएमआरडीए यांनी समन्वय साधून अतिरिक्त ‘ट्रॅफीक वॉर्डन'ची नेमणूक करण्याचे निर्देश दिले.
कल्याण-डोंबिवली महापालिका परिक्षेत्रातील डोंबिवली विभागामध्ये रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे ‘एमएमआरडीए'मार्फत सुरु करण्यात आलेली आहेत.काँक्रीटीकरणाच्या कामापूव्राी महानगर गॅस विभागातर्फे गॅस पाईपलाईन टाकण्याची कामे देखील सुरु आहेत. यामुळे डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी देखील प्राप्त होत आहेत. सदर वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीस महापालिकेचे शहर अभियंता, अति.आयुक्त, उप आयुक्त, कार्यकारी अभियंता तसेच ‘एमएमआरडीए'चे अधीक्षक अभियंता आणि सहायक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा उपस्थित होते. या बैठकीस आमदार चव्हाण यांनी वाहतूक कोंडी कमी करणेकामी महापालिका प्रशासन, पोलीस वाहतूक शाखा आणि एमएमआरडीए यांनी समन्वय साधून अतिरिक्त ‘ट्रॅफीक वॉर्डन'ची नेमणूक करण्याचे निर्देश दिले. महापालिका आयुक्त डॉ. जाखड यांनी महापालिका मार्फत पुरविण्यात आलेल्या ‘ट्रॅफीक वॉर्डन'च्या रस्तेनिहाय नेमणुकीबाबतचा तपशिल सादर करण्यासाठी वाहतूक पोलीस शाखा परिमंडळ-२ चे उपायुक्त अवधुत तावडे यांना सूचना दिल्या. आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी या बैठकीत ‘एमएमआरडीए'ला काम सुरु केलेल्या प्रत्येक रस्त्यावर वाहतूक नियोजनासाठी प्रत्येक रस्त्यावर किमान ३ ‘ट्रॅफीक वॉर्डन'ची नेमणूक करण्याचे निर्देश दिले. सदर बाबीस ‘एमएमआरडीए'चे अधीक्षक अभियंता यांनी स्विकृती दर्शाविली.
या बैठकीत आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी एमएमआरडीए अधिकारी, महापालिका अधिकारी व पोलीस विभाग वाहतुक शाखा यांचेकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची सविस्तर माहिती घेवून महापालिका अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांना या सर्व संस्थांमध्ये समन्वय साधण्याचे निर्देश दिले. परिमंडळ-२ चे उपायुक्त अवधुत तावडे यांना डोंबिवली विभागात होणाऱ्या रस्ते खोदाईच्या अनुषंगाने पाहणी करुन विविध संस्थांमध्ये समन्वय राखणेबाबत आयुक्त जाखड यांनी या बैठकीत निर्देश दिले.