भारताचे संविधान केवळ एक पुस्तक नसून आपल्या जीवनशैलीचे मार्गदर्शक-जे.एस.सहारिया
नवी मुंबई : भारताचे संविधान हे केवळ एक पुस्तक नाही तर आपल्या जीवनशैलीचे मार्गदर्शक आहे. त्यामुळे महानगरपालिकेतील प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱयांनी संविधानातील मूल्यांचा आपल्या कामकाजात कसा उपयोग होईल व यातून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी व समाजातील शेवटच्या माणसाला कशी मदत होईल याचे भान राखून काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी मुख्य आयुक्त जे.एस.सहारिया यांनी ऐरोली येथे केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ऐरोली सेक्टर-15 येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकातील सभागृहामध्ये अमृत महोत्सवी संविधान पर्वानिमित्त अधिकारी, कर्मचाऱयांसाठी संविधान परिचय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना जे.एस.सहारिया यांनी संविधानाचे महत्व विषद केले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, नगरपालिका प्रशासन संचालनालयाचे सहआयुक्त समीर उन्हाळे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे तसेच कार्यशाळेतील व्याख्यात्या कॉमनवेल्थ लोकल गव्हर्मेंट फोरम आशियाच्या प्रादेशिक कार्यक्रम व्यवस्थापक अनुया कुंवर, संविधान अभ्यासक लेखक सुरेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी कॉमनवेल्थ लोकल गव्हर्मेंट फोरम आशियाच्या प्रादेशिक कार्यक्रम व्यवस्थापक श्रीम.अनुया कुंवर यांनी संविधानाचे महत्व जाणून त्याची महती जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेऊन प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करणारी पहिली महानगरपालिका म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेचा गौरव केला. कॉमनवेल्थ लोकल गव्हर्मेंट फोरमच्या वतीने सुशासनासाठी करण्यात येणाऱया धोरणांची माहिती देत त्यांनी अबार्डिन अजेंडानुसार सुशासनासाठी प्रमाण मानके म्हणून निश्चित केलेल्या 12 तत्वांचे विवेचन केले.
संविधानाचे अभ्यासक सुरेश सावंत यांनी हे ज्ञानस्मारक म्हणजे प्रेरणास्थान असून याठिकाणी आल्यानंतर समृध्द झाल्यासारखे वाटते असे सांगत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई संविधान साक्षर मोहीम राबविण्याचे सुव्यवस्थित नियोजन केल्याबद्दल प्रशंसा केली.
महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी समारोप करताना कार्यशाळेत विचारमंथन झालेल्या विविध मुद्दयांचा परामर्श घेतला. संविधानाने ज्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाला हक्क व अधिकार दिले आहेत तशीच काही कर्तव्यदेखील सांगितली आहेत, त्यादृष्टीने लोकजागृती करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले. आपल्या अधिकारांचा वापर शिक्षा करण्यासाठी नाही तर माणसाचे जीवन आनंदी करण्यासाठी आहे, याचे भान राखून काम करावे असे मत यावेळी आयुक्तांनी व्यक्त केले.