बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा अभिवादनासाठी खुला करण्याची मागणी

उल्हासनगरः निवडणुकीच्या धामधुमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं पर्यवेक्षण, तांत्रिक परीक्षण, तपासणी राहून जायला नको. ते काम तातडीने व्हावे. पुतळ्याच्या योग्यतेची, कामाच्या मजबुतीची, सक्षमतेची खात्री करावी, आवश्यकता भासल्यास उपाययोजना व्हाव्यात; पण कोणत्याही परिस्थितीत ६ डिसेंबर रोजी उल्हासनगर मधील बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा नागरिकांना अभिवादनासाठी खुला करण्यसाठी पावलं उचलावीत, अशी मागणी ‘कायद्याने वागा लोकचळवळी'तर्फे उल्हासनगरातील सुभाष टेकडी येथील पुतळ्याबाबत महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे केली आहे.

उल्हासनगर महानालिकेकडून मूलभूत सुविधा निधीतून उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याबाबत अक्षम्य दिरंगाई झालेली आहे. या कामाचा अंदाजित खर्च १ कोटी रुपये इतका ठरवण्यात आलेला होता. अंतिमतः ८५ लाखांच्या खर्चाची निश्चिती झालेली असली तरी, सदरच्या कामात २५-३० लाखांइतकाही खर्च न झाल्याचं व भ्रष्टाचार झाल्याचं प्रथमदर्शनीच दिसून येत आहे. त्याची चौकशी व्हावी, अशी मागणीही ‘कायद्याने वागा लोकचळवळी'चे प्रणेते राज असराेंडकर यांनी आयुक्तांना दिलेल्या लेखी निवेदनात केली आहे.

सुभाष टेकडी येथील सदर ठिकाणी अनेक वर्षांपासून अर्धपुतळा होता. त्या अर्धपुतळ्याच्या प्रेरणेनेच आजवर स्थानिक नागरिकांची वाटचाल झाली. तिथून हाकेच्या अंतरावर तक्षशिला विद्यालयाच्या प्रांगणात पूर्णाकृती पुतळा असताना, नव्या पूर्णाकृती पुतळ्याची काहीही गरज नव्हती. पण, विचारांपेक्षा स्वार्थी राजकारण सरस ठरले. पूर्णाकृती पुतळ्याचे काम हाती घेण्याच्या काही दिवस आधीच अर्धपुतळ्याच्या चबुतऱ्याचे नुतनीकरण झालेले होते, ते वाया गेले. पूर्णाकृती पुतळ्याचे काम मंजूर झाल्यानंतरही सदरचे काम रखडून राहिलेले होते. इतक्या वर्षात यंदा पहिल्यांदाच १४ एप्रिल रोजी सुभाष टेकडी चौकात आंबेडकर जयंती साजरी झाली नाही. तेथे पुतळा जागेवर नव्हता, सदर बाब असराेंडकर यांनी आयुक्त ढाकणे यांच्या निदर्शनास आणली आहे.

दरम्यान, या संदर्भात महापालिका आयुक्त विकास ढाकणे म्हणाले की, नुकतीच विधानसभा निवडणूक संपन्न झाली आहे. महापालिका अधिकारी-कर्मचारी या निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या बाबत आम्ही गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करु, असे त्यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उद्या ‘महामुंबई सेझ'ग्रस्तांच्या जमिनी परत करण्याची सुनावणी