अटीतटीच्या लढतीत मंदाताई म्हात्रे विजयी 

संदीप नाईक यांची पुर्नमतमोजणीसाठी मागणी 

नवी मुंबई : बेलापूर विधानसभा निवडणुकीत ‘भाजपा'च्या आ. मंदाताई म्हात्रे यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष'चे उमेदवार संदीप नाईक यांना पराभूत करत अवघ्या ३७७ मतांनी विजय प्राप्त केला आहे. मंदाताई म्हात्रे यांच्या या विजयामुळे नवी मुंबईकरांनी २०१४ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती झाल्याचा अनुभव घेतला. मंदाताई म्हात्रे यांना ९१,८५२ मते मिळाली. तर संदीप नाईक यांना ९१,४७५ इतकी मते मिळाली. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत सलग तीन वेळा निवडून येत मंदाताई म्हात्रे यांनी आमदारकीची हॅटट्रीक साधली आहे. 

अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत पहिल्या फेरीपासून मंदाताई म्हात्रे आणि संदीप नाईक यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरु होती. पहिल्या १५ फेऱ्यांपर्यंत मंदाताई म्हात्रे या जवळपास ३५०० मतांनी आघाडीवर होत्या. मात्र, त्यानंतर संदीप नाईक यांनी मंदाताई म्हात्रे यांची आघाडी कमी करीत २४ व्या फेरीपर्यंत ४ हजार मतांची आघाडी प्राप्त केली होती. 

मात्र, २५ ते २७ व्या फेरीत संदीप नाईक यांचे मताधिक्य कमी होत गेले. २७ व्या फेरी अखेरपर्यंत संदीप नाईक ६०० मतांनी आघाडीवर होते. परंतु, अखेरच्या २८ व्या फेरीअंती मंदाताई म्हात्रे यांनी आघाडी मिळवत ३७७ मतांनी विजय प्राप्त केला. शेवटची मतपेटी दिवाळे गांवची उघडण्यात आली. अखेर या गावातील मतदारांनी मंदाताई म्हात्रे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना विजयी केले. 

२०१४ च्या विजयाची पुनरावृत्ती...
सन २०१४ च्या निवडणुकीत मंदाताई म्हात्रे या ‘राष्ट्रवादी काँग्रेस'ला राम राम ठोकत ‘भाजपा'मध्ये दाखल झाल्या होत्या. यावेळी ‘भाजपा'च्या तिकीटावर बेलापूर विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या मंदाताई म्हात्रे यांनी गणेश नाईक यांना अवघ्या १४९१ मतांनी पराभूत केले होते. त्यावेळी जायंट किलर म्हणून मंदाताई म्हात्रे यांचा उल्लेख करण्यात आला होता. 

दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत गणेश नाईक आणि संदीप नाईक यांनी आपल्या ५० नगरसेवकांसह ‘भाजपा'मध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी ‘भाजपा-सेना युती'ने विधानसभा निवडणुका एकत्रित लढविल्याने ऐरोली आणि ‘बेलापूर'ची जागा ‘भाजपा'च्या वाट्याला गेली. त्यामुळे ऐरोलीतून गणेश नाईक आणि बेलापूर मधून मंदाताई म्हात्रे यांना ‘भाजपा'ने विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. तर आपल्या वडिलांसाठी ऐरोलीची जागा सोडावी लागलेल्या संदीप नाईक यांच्यावर ‘भाजपा'ने नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली होती. 

गेली ५ वर्षे विधिमंडळ राजकारणातून दूर असलेल्या संदीप नाईक यांना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत देखील ‘भाजपा'ने उमेदवारी न दिल्याने नाराज झालेल्या संदीप नाईक यांनी ‘भाजपा'ला सोडचिट्टी देत शरद पवारांच्या ‘राष्ट्रवादी'ची तुतारी हातात घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे बेलापूरमधून उमेदवारी अर्ज दाखल करत संदीप नाईक यांनी ‘भाजपा'च्या मंदाताई म्हात्रे यांना आव्हान उभे केले होते. संदीप नाईक यांच्यासोबत बेलापूर विधानसभा मतदारसंघातील २५ माजी नगरसेवक ‘राष्ट्रवादी'मध्ये गेल्यामुळे त्यांचे पारडे जड मानले जात होते.

त्यात शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार विजय नाहटा यांनी बेलापूरमधून अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे मंदाताई म्हात्रे यांचा विजय खडतर मानला जात होता. शिवाय ‘मनसे'चे गजानन काळे यांना मिळणारे मताधिक्य भाजप उमेदवाराला मारक ठरणार होते. परिणामी, बेलापूरची लढत बंडखोरांमुळे अधिक चुरशीची ठरली होतीच. शिवाय सर्वच उमेदवारांसाठी अस्तित्वाची ठरली होती. अखेर या अटीतटीच्या लढतीत मंदाताई म्हात्रे यांनी ३७७ मतांनी बाजी मारत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

संदीप नाईक यांची पुर्नमतमोजणीची मागणी...
बेलापूर विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला मिळालेले मताधिक्य संशयास्पद असून आपण निवडणूक प्रक्रिया कलम ५६-डी अंतर्गत संपूर्ण पुनर्मतमोजणीची मागणी १५१-बेलापूर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केल्याची संदीप नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जर पुर्नमतमोजणी केली नाही तर आपण न्यायालयात धाव घेणार असल्याचे संदीप नाईक म्हणाले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

आ. प्रशांत ठाकूर यांनी घडविला इतिहास