यंत्रणा सज्ज; आता मतदार राजाची जबाबदारी

मुंबई : आज २० नोव्हेंबर रोजी राज्यात ‘लोकशाहीचा उत्सव' होत आहे. ‘लोकशाहीच्या उत्सव'साठी अर्थातच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ होत आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान केंद्रावर रांगेत उपस्थित असलेल्या सर्व मतदारांचे मतदान होईपर्यंत त्या मतदान केंद्रावर मतदान घेतले जाणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानासाठी २ लाख २१ हजार ६० बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे.    

मतदार नोंदणीत वाढ; राज्यात ९.७ कोटी मतदार...
विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघातील सुमारे ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष ५ कोटी २२ हजार ७३९, तर महिला मतदार ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ इतक्या आहेत. ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार असून मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे.  

४.६९ कोटी महिला मतदार...
राज्यात ४,६९,९६,२७९ महिला मतदार  आहेत. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या ५ जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. दिव्यांग मतदारांची एकूण संख्या ६,४१,४२५ इतकी असून सेना दलातील मतदारांची  संख्या १,१६,१७० आहे.

एकूण ४१३६ उमेदवार...
राज्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात एकूण ४,१३६ उमेदवार आहेत. ज्यामध्ये ३,७७१ पुरूष, ३६३  महिला आणि तर अन्य २ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

मतदानासाठी २,२१,६०० बॅलेट युनिट...
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पुरेशा संख्येने ईव्हीएम उपलब्ध असून पुरेसा साठा आहे. ‘महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४'च्या अनुषंगाने १,००,१८६ इतक्या मतदान केंद्रांसाठी २,२१,६०० बॅलेट युनिट, १,२१,८८६ कंट्रोल युनिट आणि १,३२,०९४ व्हीव्हीपॅट इतक्या प्रथमस्तरीय तपासणी मशिन्स उपलब्ध असून एकूण प्रथमस्तरीय करण्यात आलेल्या ईव्हीएम पैकी प्रशिक्षण आणि जनजागृतीच्या कार्यक्रमाकरिता त्यापैकी ५१६६ बॅलेट युनिट, ५१६६ कंट्रोल युनिट आणि ५१६५ व्हीव्हीपॅट इतक्या मशिन्सचा वापर करण्यात आला आहे. या सर्व बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि ईव्हीएम मशिन्सची प्रथम सरमिसळ १८ ते २१ ऑक्टोबर, 2024 या कालावधीत सर्व जिल्ह्यांकडून करण्यात आलेली आहे. या निवडणुकीत एकूण १८५ विधानसभा  मतदाररसंघात एक बॅलेट  युनिटची आवश्यकता आहे. तर १००  मतदारसंघात २ बॅलेट युनिट आणि ३ मतदारसंघांमध्ये ३ बॅलेट युनिट लागणार आहेत.

१ लाखांहून अधिक मतदान केंद्र सज्ज...
विधानसभा निवडणुकीसाठी ‘निवडणूक आयोग'मार्फत राज्यभरात १ लाख ४२७ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मतदारांना सुलभतेने मतदान करता येण्यासाठी राज्यात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान केंद्र पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यात ८,४६२ मतदान केंद्र आहेत. त्यानंतर मुंबई उपनगर येथे ७५७९, ठाणे ६९५५, नाशिक ४९२२ तर नागपूर येथे ४६३१ मतदान केंद्र आहेत.

महाराष्ट्रातील २४१ विधानसभा मतदारसंघात मुख्य आणि सहायक मतदान केंद्रांची संख्या निश्चित केली आहे. यंदा राज्यात मुख्य मतदान केंद्र १ लाख १८६ असून त्यापैकी शहरी भागात ४२,६०४ तर ग्रामीण भागात ५७,५८२ इतकी मतदान केंद्र राहणार आहेत. सहायक मतदान केंद्रांची संख्या २४१ इतकी आहेत. मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी गेल्या काही निवडणुकांच्या तुलनेत मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

अतिउंच इमारती, सहकारी गृहनिर्माण संकुलात मतदान केंद्रे...
मतदारांच्या संख्येच्या प्रमाणात मतदान केंद्राच्या संख्येत वाढ केली असून राज्यात  एकूण मतदान केंद्रे १,००,१८६ आहेत. यामध्ये शहरी मतदान केंद्र ४२,६०४ तर ग्रामीण मतदान केंद्र ५७,५८२ इतकी आहेत. शहरी भागातील मतदारांची अनास्था विचारात घेऊन शहरी भागातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे, यासाठी पुणे, मुंबई, ठाणे, आदि शहरांमध्ये अतिउंच इमारती, सहकारी गृहनिर्माण संस्थांची संकुले यामध्ये एकूण १,१८१ मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेत. झोपडपट्टी भागात २१० मतदान केंद्र उभारण्यात आली असून सहाय्यक मतदान केंद्रांची एकूण संख्या २४१ इतकी आहे.

आदिवासी, दुर्गम क्षेत्रावर विशेष लक्ष...
यंदाच्या निवडणुकीत आदिवासी मतदारसंघ आणि दुर्गम भागांतील मतदारांसाठी विशेष सुविधा देण्यावर भर दिला आहे. गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार, धुळे, आणि अमरावती जिल्ह्यात जेथे आदिवासी आणि दुर्गम भाग आहेत तेथे मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी ‘टीएमटी'ची बसव्यवस्था