गरीबांची प्रगती झाली तरच ‘सुराज्य'ची संकल्पसिध्दी -पंतप्रधान
नवी मुंबई : आपल्याला विकसित भारताच्या निर्मितीसाठी स्वराजासह सुराज्यचा संकल्प पुढे न्यायचा आहे. गरीबांची प्रगती झाली तरच ‘सुराज्य'चा संकल्प पुढे नेता येईल. ते फक्त भाजपा आणि महायुती सरकारच पूर्ण करु शकते. काँग्रेस पक्षाकडून प्रत्येक पिढीला ‘गरीबी हटाओ' अशी खोटी घोषणा दिली जाते. पण, ‘गरीबी हटाओ' म्हणत ‘काँग्रेस'ने गरीबांनाच लुटले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खारघर मध्ये केला.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ‘महायुती'च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी १४ नोव्हेंबर रोजी खारघर मधील सेंट्रल पार्क मैदान येथे झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणातून ‘काँग्रेस' आणि ‘महाविकास आघाडी'वर हल्लाबोल केला.
नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी आगामी काळात डेटा-एआय यांचे मोठे केंद्र बनणार आहे. पनवेलमध्ये सेमी कंडक्टर क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार आहे. पालघर बंदर आणि वाढवण बंदराच्या माध्यमातून विकासाचे नवे रस्ते तयार होतील. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी मिळतील. पनवेल-रायगडच्या या भागात मोठी सागरी संपत्ती आहे. मच्छीमारांसाठी आधुनिक बोटींसह इतर योजना सुरु केल्या आहेत. महायुती सरकार महादेव कोळी आणि आगरी समाजासाठी अनेक योजना चालवत आहेत. कोकणात तीन बंदर निर्माण होत आहेत, त्यामुळे देखील सागरी अर्थव्यस्थेला चालना मिळेल, असे पंतप्रधान मोेदी म्हणाले.
आमच्या सरकारने देशातील गरीबांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत. त्यामुळे गरीब आता पुढे जात आहे, तो देशाला पुढे नेत आहे. या योजनांचा सर्वात मोठा लाभार्थी आमचा दलित, आदिवासी, मागास समाज आहे. महायुती सरकारची नीती शोषित आणि वंचितांची ताकद बनत आहे. त्यामुळेच काँग्रेस गरीब, मध्यमवर्गीयांचे जीवन सुसह्य करणाऱ्या योजनांना विरोध करत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
आम्ही देशभरात शौचालये तयार केली. काँग्रेसवाले त्याची थट्टा करीत राहिले. पण, आज तीच शौचालये महिलांसाठी इज्जतघर बनली असून उत्तर प्रदेशात त्याला इज्जत घर या नावाने ओखळले जात आहे. आम्ही ३ कोटी महिलांसाठी लखपती दीदी करण्याची योजना सुरु केली आहे, असे सांगत काँग्रेस व्होट बँकेच्या राजकारणात गरीबांच्या योजनांना विरोध करीत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
दुसरीकडे आज अनेक राज्यात ‘काँग्रेस'चे अस्तित्व धोक्यात आले आहे. ते अस्तित्व टिकवण्यसाठी, सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस समाजात विष पसरवण्याचे काम करीत आहे. एससी, ओबीसी, एसटी घटक पुढे गेला तर काँग्रेस अस्वस्थ होते. मागासवर्ग जातीमध्ये विखुरला जावा, अशी ‘काँग्रेस'ची योजना आहे. पण, दलित, मागास, आदिवासी एकसंघ राहिले नाही तर ‘काँग्रेस'च्या खोट्या प्रचारांमुळे सदर सर्व घटक भ्रमित होऊन ‘काँग्रेस'ला सत्ता स्थापनेची संधी मिळेल. मग ते संधी मिळाली तर ते आरक्षण संपवतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांनी आपण 'एक है तो सेफ है' असे आवाहन उपस्थितांना केले.