ऐरोली विधानसभा मतदारसंघात ‘सांगली पॅटर्न'?

वाशी: गेल्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाल्यानंतर ‘सांगली पॅटर्न'ची जोरदार चर्चा झाली होती. तर आता ऐरोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) देखील सांगली पॅटर्न राबवत असल्याची चर्चा सुरु  झाली आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांच्या विजयासाठी ‘शिवसेना'चे (शिंदे गट) सर्व माजी नगरसेवक उघड-उघड प्रचार करत असल्याचे चित्र दिसत आहे.

नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही विधानसभा मतदारसंघात महायुती तर्फे भाजपा लढत आहे. मात्र, या दोन्ही जागांवर ‘शिवसेना' मधील शिंदे समर्थकांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोरांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याने त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा छुपा पाठिंबा आहे का?, अशी चर्चा सुरु होती. मात्र, चार दिवसांपूर्वी बेलापूर मध्ये खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आ. मंदाताई म्हात्रे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर शिंदे गटाचे माजी नगरसेवक आ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रचारात दिसू लागले आहेत. मात्र, यावेळी ऐरोली विधानसभा मतदारसंघ बाबत खा. नरेश म्हस्के यांनी कुठलाच निरोप न दिल्याने शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांना विजय चौगुले यांच्या पाठीमागे राहण्याचे अप्रत्यक्ष संकेतच मिळाले आहेत. त्यामुळे १० नोव्हेंबर पासून शिंदे गटाचे सुरेश कुलकर्णी, शिवराम पाटील, विलास भोईर यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी विजय चौगुले यांचा उघड उघड प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिंदे  गटाची विजय चौगुले तसेच माजी  नगरसेवक यांना मिळालेली मोकळीक पाहता ऐरोली विधानसभा क्षेत्रात भाजप उमेदवार गणेश नाईक यांना मात देण्यासाठी सांगली पॅटर्न राबवला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

निवडणूक कर्तव्य नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लवकरच कारवाई