आचारसंहितेची संधी साधून खारघर मध्ये अनधिकृत बांधकाम
खारघर: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आचारसंहितेची संधी साधून खारघर सेक्टर-१४ आणि सेवटर-१६ मध्ये बेकायदेशीर बांधकाम केले जात आहे. सदर बांधकाम तातडीने थांबवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यां सीमा टाक यांनी राज्य निवडणूक आयोग, केंद्रीय दक्षता आयोग, मुख्यमंत्री, पनवेल महापालिका आणि सिडको प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खारघर सेक्टर-१४ मधील पदपथावर अनधिकृत बांधकाम करुन मार्केट उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे पदपथ पादचाऱ्यांसाठी असताना पदपथावर काही माजी नगरसेवकांकडून अनधिकृत बांधकाम करुन भाजीपाला, फळे आणि मटण, चिकन विक्रेत्यांना चिन्हांकित जागा देऊन बाजार भरविला जात आहे. याशिवाय खारघर सेक्टर-१६ मधील वास्तुविहार येथील भूखंडावर बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पनवेल महापालिका आयुक्तांसह सिडको अधिकारी बेकायदा अतिक्रमणाकडे डोळेझाक करत आहेत. त्यामुळे पदपथावर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सीमा टाक यांनी केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोग, केंद्रीय दक्षता आयोग, मुख्यमंत्री कार्यालय, नगरविकास विभाग, सिडको, पनवेल महापालिका तसेच पोलीस आयुक्ताकडे केली आहे,.