आम्ही मतदान करणार, तुम्हीही मतदान करा!
नवी मुंबई: २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ‘आम्ही मतदान करणार' असा निर्धार करीत ‘तुम्हीही मतदान करा' असे आवाहन नवी मुंबईत ठिकठिकाणी स्वीप कार्यक्रमांतर्गत आयोजित केलेल्या उपक्रमांमध्ये नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने केले.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता १५०-ऐरोली आणि १५१-बेलापूर या दोन्ही विधानसभा निवडणूक कार्यालयांमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असून नवी मुंबई महापालिकाही स्वीप कार्यक्रमांतर्गत वेगवेगळ्या माध्यमांतून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे.
याचाच एक भाग म्हणून ‘निवडणूक आयोग'मार्फत ८ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत स्वीप कार्यक्रमांतर्गत विशेष उपक्रम राबविण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, स्वीपचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक दिवशी राबवावयाच्या उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत ८ नोव्हेंबर रोजी नवी मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांसमवेत सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी एकत्रितपणे सामुहिक मतदार प्रतिज्ञा ग्रहण केली.
त्याचप्रमाणे ‘नमुंमपा'च्या ८ विभाग कार्यालयांमध्ये तेथील सहाय्यक आयुक्त यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित नागरिकांसह मतदार प्रतिज्ञा घ्ोतली. त्याचप्रमाणे आठही विभाग कार्यालय क्षेत्रात विविध ठिकाणी नागरिकांना एकत्र करुन त्यांना मतदानाचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्यासह मतदार प्रतिज्ञा सामुहिकरित्या याशिवाय १५०-ऐरोली विधानसभा निवडणूक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता भिकाने आणि १५१-बेलापूर विधानसभा मतदार निवडणूक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी पाटील यांनी निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांच्या समवेत मतदान प्रतिज्ञा घेतली.
९ नोव्हेंबर रोजी ऐरोली विधानसभेच्या स्वीप नोडल अधिकारी उपायुक्त अभिलाषा म्हात्रे आणि बेलापूर विधानसभा स्वीप नोडल अधिकारी सहा. आयुक्त सागर मोरे यांच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात शासकीय कार्यालये, नाट्यगृह, मॉल, रेल्वे स्टेशन, उद्याने, पर्यटन स्थळे अशा नागरिकांची वर्दळ असणाऱ्या विविध ठिकाणी रांगोळी काढून त्यातून मतदान करण्याचा संदेश प्रसारित करण्यात आला.
दरम्यान, अशाच प्रकारे या पुढील काळात विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचविला जाणार आहे.