नमुंमपा आयुक्त, विभागप्रमुख, अधिकारी-कर्मचारी यांची मतदार प्रतिज्ञा

नवी मुंबई : आपण आपल्या अधिकारांबाबत जितके जागरुक असतो तितकेच आपल्या कर्तव्याबाबतही जागरुक असणे गरजेचे आहे. तसेच २० नोव्हेंबर रोजी प्रत्येकाने लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करावे तसेच आपल्या नातेवाईक, परिचितांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे असे, आवाहन नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

‘राज्य निवडणूक आयोग'च्या वतीने स्वीप कार्यक्रमांतर्गत ८ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत मतदार जागरुकताविषयी विविध उपक्रम राबविण्याचे वेळापत्रक प्राप्त झाले असून त्या अंतर्गत महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यासमवेत उपस्थित विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांनी मतदार प्रतिज्ञा सामुहिकरित्या ग्रहण केली. केवळ तोंडी प्रतिज्ञा न घेता तिचे पालन करावे आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आयुक्त डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार आणि डॉ.अमोल शिंदे, प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार, मुख्य लेखा- वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, मुख्य लेखा परीक्षक जितेंद्र इंगळे, उपायुक्त किसनराव पलांडे, संतोष वारुळे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, सहा. आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण तसेच अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत नियुक्त नवी मुंबईतील १५०-ऐरोली आणि १५१-बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघाचे स्वीप नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी निवडणूक कार्यालयांप्रमाणेच आयुक्त शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिकेच्या वतीने स्वीप अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या आणि नियोजित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून पोस्टर्स, होर्डींग, बॅनर्स, कलावंतांचे मतदान करावे असे आवाहन करणाऱ्या व्हिडिओ चित्रफिती, सोशल मिडीया पोस्ट यापुढे जात थेट मतदारांपर्यंत पोहोचून आणि त्यातही मागील वेळी कमी मतदान झाले आहे, अशा भागांवर लक्ष केंद्रीत करुन तेथील मतदारांना मतदान करण्याविषयी आवाहन करण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. याकामी महापालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनीही आपण राहतो त्या सोसायटी, वसाहतींमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

यावेळी ‘निवडणूक आयोग'ने प्रसिध्द केलेल्या मतदान गीताचे प्रसारण करण्यात आले. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार महापालिकेच्या आठही विभाग कार्यालय क्षेत्रात स्वीप कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपायुक्त दर्जाच्या अतिरिक्त स्वीप नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत ‘निवडणूक आयोग'ने दिलेल्या वेळापत्रकानुसार मतदार जागरुकता उपक्रम राबवून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, महापालिका मुख्यालयाप्रमाणेच विधानसभा निवडणूक कार्यालयांमार्फतही दोन्ही मतदारसंघात विविध ठिकाणी सामुहिक मतदार प्रतिज्ञा घेण्याचे उपक्रम राबविण्यात आले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रचार रॅलीमुळे कामगारांच्या हातांना काम