‘ड्रोन'चा वॉचडॉग; उल्हासनगर मध्ये नवीन तंत्रज्ञानाची चाचपणी
उल्हासनगर : विधानसभा निवडणुकीच्या काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उल्हासनगर पोलीस ठाण्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शहराच्या सुरक्षेत वाढ केली आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार आणि परिमंडळ-४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगरातील बिर्ला गेट, शहाड जकात नाका आणि शहाड ब्रिज परिसरात ड्रोन पेट्रोलिंगसह नाकाबंदी तपासणी मोहीम राबवण्यात आली. संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली, वाहतूक निरीक्षक अविनाश भामरे आणि एस.एस.टी. पथकातील सहकारी अमलदार यांच्या उपस्थितीत सदर मोहीम सुरु करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विशेष मोहिमेत ड्रोन कॅमेराचा वापर करून परिसरातील सर्व हालचालींवर नियंत्रण ठेवण्यात आले. ड्रोनच्या सहाय्याने वाहने आणि वाहन चालक यांच्या हालचालींवर नजर ठेवून त्यांच्याकडून कोणतेही बेकायदेशीर कृत्य घडत असल्यास त्वरित लक्षात आणणे शक्य झाले आहे. दूर अंतरावरुन देखील ड्रोनने पोलीस कर्मचाऱ्यांना परिसरात होणाऱ्या संशयास्पद हालचालींवर त्वरित नजर ठेवण्याची सोय दिली. वाहनांमध्ये लपवून ठेवलेली अवैध दारु, बेकायदेशीर कॅश आणि इतर बेकायदेशीर वस्तू शोधण्यात ड्रोन कॅमेराने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
बिर्ला गेट, शहाड जकात नाका आणि शहाड ब्रिज भागात केलेल्या नाकाबंदी दरम्यान एस.एस.टी. पथकाने वाहनांची कसून तपासणी केली. अवैध वस्तुंचा वापर टाळण्यासाठी ड्रोन पेट्रोलिंगच्या माध्यमातून मिळालेल्या संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित मिळत होती. तसेच वाहन चालकांकडून कोणताही बेकायदेशीर वापर केला जात आहे का? यावर लक्ष ठेवण्यात आले. यामुळे निवडणुकीत अवैध दारु, रोख रक्कम, आणि इतर बेकायदेशीर वस्तूंचा वापर होण्यास प्रतिबंध होणार आहे.
या मोहिमेने शहरातील नागरिकांमध्ये पोलीस दलाबद्दल विश्वास वाढवला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पोलीस प्रशासनाने निवडणूक काळात शहरात सुरक्षेसाठी घेतलेल्या या पावलांची सर्वत्र प्रशंसा होत आहे. अनेकांनी ड्रोन पेट्रोलिंगला समर्थन देत, शहराच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलीस दल सज्ज असल्याचे समाधान व्यक्त केले आहे. उल्हासनगर पोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निवडणुकीत अवैध वस्तुंचा वापर आणि गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. शहरातील शांतता आणि सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी पोलीस दलाच्या या नव्या पध्दतीची नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया उमटली आहे.
ड्रोन तंत्रज्ञानामुळे आमची तपासणी प्रक्रिया अधिक अचूक आणि जलद झाली आहे. यातून कोणत्याही संशयास्पद हालचालींवर त्वरित नियंत्रण मिळवण्यास मदत होते. ज्यामुळे निवडणूक काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहते. - विष्णू ताम्हाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक-उल्हासनगर पोलीस ठाणे.