दरवाढीने ताटातून कांदा हद्दपार होण्याच्या वाटेवर
वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कांदा-बटाटा बाजारात कांद्याची आवक कमी झाल्याने कांदा दर पुन्हा उसळी घेत आहे. एपीएमसी घाऊक कांदा-बटाटा बाजारात कांद्याने साठीपार केली असून, किरकोळ बाजारात कांदा प्रतिकिलो ८० रुपयांवर गेला आहे. दिवसेंदिवस कांदा दरात वाढ होत असल्याने हॉटेल तसेच छोटे खानावळ व्यावसायिक यांच्या ताटातून कांदा गायब होण्याच्या मार्गावर आहे.
एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात नवीन कांदा दाखल होताच कांद्याचे दर आवाक्यात येतील, अशी ग्राहकांना अपेक्षा होती. सुरुवातीला कांदा दर स्थिरावले होते. मात्र, आता पुन्हा आवक कमी होत असल्याने कांदा दरवाढ झाली आहे. अवेळी पडलेल्या पावसाने कांदा उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यामुळे नवीन कांदा आवक कमी आहे. याशिवाय जुना कांदा आवक कमी होत आहे. तसेच नाफेडद्वारे होणारी कांदा आवक पुर्णतः बंद आहे. त्यामुळे कांदा दरवाढ होत आहे. घाऊक बाजारात कांदा प्रतिकिलो ६०-६५ रुपये तर किरकोळ बाजारात प्रतिकिलो ८० रुपये दराने विक्री होत आहे.
कांदा भाव वाढीमुळे नवी मुंबई शहरातील अनेक हॉटेल, वडापाव गाड्या, खानावळीतील ताटातून कांदा गायब होण्याच्या दिशेने आहे. हॉटेल व्यावसायिक यांच्याकडून थाळीसोबत कांद्याच्या एक-दोन फोड ग्राहकांना दिल्या जात असताना आता मात्र आखडता हात घेतला जात आहे. त्याचबरोबर भजी विक्रेत्यांनी कांदा भजी ऐवजी आता पालक भजी विक्रीचा पर्याय निवडला आहे. कांद्याचे दर आणखीन वधारले तर कांदा खायचा कसा?, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होणार आहे.
दिवसेंदिवस कांदा दरात वाढ होत असून, कांद्याने आता प्रतिकिलो दर ८० रुपये पार केला आहे. त्यामुळे कांद्याची भजी कशी विकायची अशी चिंता सतावू लागली आहे. परिणामी आपण कांदा भजीला पालक भजीचा पर्याय निवडला आहे. - पवन पांडे, भजी विक्रेता - नवी मुंबई.