विधानसभा निवडणुकीचा दैनंदिन कामाला फटका

तुर्भे : नवी मुंबई महापालिका मधील बहुतांश कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामाला गेल्याने नवी मुंबई शहरातील दैनंदिन कामावर परिणाम झाला आहे. नवी मुंबई महापालिका मधील १ हजार २०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची विधानसभा निवडणुकीच्या कामाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे.

देशात होत असलेल्या विविध निवडणुकासाठी निवडणूक आयोगाचा स्वतंत्र असा कर्मचारी वर्ग मुबलक प्रमाणात नाही. त्यामुळे लोकसभा, विधानसभा किंवा अन्य निवडणुकीच्या कामासाठी सर्व स्थानिक प्राधिकरणांच्या कर्मचाऱ्यांना बोलवले जाते.  त्यानुसार सध्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीकरिता नवी मुंबई शहरातील सिडको, एमआयडीसी आणि नवी मुंबई महापालिकासह अन्य प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम लावले आहे. या कर्मचाऱ्यांना बीएलओ, केंद्र अध्यक्ष, मतदान अधिकारी, भरारी पथक कर्मचारी, कार्यालयीन कामकाज कर्मचारी, मतदान जनजागृती, शिपाई आदी कामांसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांना ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी कामकाज सोपवण्यात आले आहे. मागील दोन महिन्यांपासून यातील अनेक कर्मचारी ऐरोली, बेलापूर यासह अन्य  विधानसभा मतदारसंघ कार्यालयात दैनंदिन कामाकरिता नियुक्त केले आहेत. तसेच अन्य कर्मचारी आवश्यकतेनुसार विधानसभा कार्यालयात बोलावले जातात. कर्मचाऱ्यांना निवडणुकीशी संबंधित प्रशिक्षणासाठी देखील दिवसभर बोलवले जाते. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील आठ विभाग कार्यालय तसेच मुख्यालय या ठिकाणी दैनंदिन कामासाठी शेकडो नागरिक येत असतात. मात्र, या ठिकाणी आल्यावर त्यांना कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी गेले असल्याचे एकच मोघम उत्तर दिले जाते. तसेच महापालिका कर्मचारी कधी येतील याची देखील नागरिकांना माहिती दिली जात नाही. परिणामी नागरिकांना खाली हात परत जावे लागते अन्‌ पुन्हा एक-दोन दिवसांनी महापालिका विभाग कार्यालय आणि मुख्यालयाचे हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. 

कर्मचारी निवडणुकीच्या कामावर असल्याने महापालिका मुख्यालयातील अनेक विभाग रिक्त असल्याचे आढळून येते. तसेच यामध्ये निवडणुकीच्या कामाला न गेलेले काही संधी साधू कर्मचारी आपली जागा सोडून अन्यत्र जातात. निवडणुकीच्या कामाला जात असल्याच्या नावाखाली काही कर्मचारी दुपारी जेवणानंतर तर काही सायंकाळी पाचच्या आधीच कामावरुन गायब होत आहेत. यामुळे जनतेच्या कामाचा खोळंबा होत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दरवाढीने ताटातून कांदा हद्दपार होण्याच्या वाटेवर