‘महाविकास आघाडी'चा नक्की उमेदवार कोण?
खारघर : पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये ‘शेकाप'चे उमदेवार माजी आमदार बाळाराम पाटील तसेच ‘शिवसेना ठाकरे गट'च्या उमदेवार लीना गरड या दोघांकडून ‘महाविकास आघाडी'चे उमेदवार म्हणून प्रचार केला जात आहे. त्यामुळे ‘महाविकास आघाडी'चे उमेदवार कोण? असा प्रश्न मतदारांकडून विचारला जात आहे.
लोकसभा निवडणुकीत ‘महायुती'चे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पनवेल विधानसभा मतदारसंघातून फार थोड्या मतांची आघाडी मिळाली होती. विशेष म्हणजे ग्रामीण भागातून ‘महाविकास आघाडी'ला मताधिक्य मिळाल्यामुळे पनवेल विधानसभा निवडणुकीत ‘महाविकास आघाडी'ला यश मिळण्याची आशा पल्लवित झाल्यामुळे ‘शेकापे'चे बाळाराम पाटील गेल्या ६ महिन्यापासून विधानसभा निवडणुकीची तयारी करीत असून शेकाप कडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता ते ‘महाविकास आघाडी'चे उमदेवार म्हणून प्रचार करीत आहे. तर ‘कॉलनी फोरम'च्या अध्यक्षा तथा माजी नगरसेविका लीना गरड यांनी ‘शिवसेना ठाकरे गट'मध्ये प्रवेश करुन ‘शिवसेना'ची उमेदवारी मिळविल्याने त्यांनीही ‘महाविकास आघाडी'च्या अधिकृत उमेदवार म्हणून प्रचार सुरु केला आहे. लीना गरड ‘महाविकास आघाडी'च्या उमदेवार म्हणून प्रचार करीत असल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, बाळाराम पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून आपणच ‘महाविकास आघाडी'चे उमेदवार असल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस आणि सपाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.
पनवेल विधानसभा मतदार संघात ‘महाविकास आघाडी'चे उमदेवार बाळाराम पाटील असून कार्यकर्त्यांनी बाळाराम पाटील यांच्या प्रचाराला सहकार्य करुन भरघोस मतांनी निवडून आणावे, असे आदेश पक्षाकडून प्राप्त झाले आहे. - सतीश पाटील, पनवेल जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष.
मी शिवसेना ठाकरे गट आणि ‘महाविकास आघाडी'ची अधिकृत उमदेवार आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी लवकरच चर्चा करुन मशाल चिन्ह, ‘महाविकास आघाडी'चे उमदेवार याबाबतचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. - लीना गरड, उमदेवार-शिवसेना ठाकरे गट.