‘दिवाळी पहाट' कार्यक्रमांसह विविध ठिकाणी मतदार जनजागृती
नवी मुंबई : २० नोव्हेंबर रोजी होणारी विधानसभा निवडणूक संपूर्ण राज्यात एकाच दिवशी होत असून यामध्ये प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क कर्तव्य भावनेने बजावावा, याकरिता मतदार जागरुकता कार्यक्रम मोठया प्रमाणावर राबविण्यात येत आहेत.
यामध्ये दिवाळी कालावधीत ठिकठिकाणी आयोजित केल्या गेलेल्या दिवाळी पहाट सांगितिक उपक्रमांमध्येही १५०- ऐरोली आणि १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप कार्यक्रमाशी संबधित अधिकाऱ्यांनी तसेच महापालिकेच्या संबधित विभाग कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी उपस्थित राहून नागरिकांचे मतदानाविषयी प्रबोधन केले.
वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात १ आणि ३ नोव्हेंबर रोजी आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांना मतदान करण्याविषयी आवाहन करण्यात आले. तसेही नाट्यगृहामध्ये दररोज होणाऱ्या नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सुरुवातीला, मध्यंतरात आणि कार्यक्रम संपल्यानंतर मतदान करण्याचे आवाहन करणारी ध्वनीफित प्रसारित करण्यात येत आहे.
अशाचप्रकारे ज्वेल ऑफ नवी मुंबई नेरुळ येथे, करावेगांव येथे तसेच ऐरोली येथे शिवकॉलनी आणि विविध ठिकाणी आयोजित ‘दिवाळी पहाट'च्या सांगितीक कार्यक्रमांप्रसंगी स्वीप पथकाने उपस्थित राहत मतदान करण्याविषयी आवाहन करत जागरुकता निर्माण केली. राजर्षी शाहू महाराज विद्यालय, आंबेडकरनगर-रबाळे येथील दिवाळी संध्या उपक्रमातही मतदार जनजागृती करण्यात आली.
भाऊबीजेच्या दिवशी स्वीप पथकातील महिला कर्मचाऱ्यांनी ऐरोली येथील अग्निशमन केंद्रामध्ये जाऊन अग्निशमन अधिकारी, कर्मचारी यांची ओवाळणी करीत त्यांना ओवाळणी म्हणून २० नोव्हेंबरला मतदान करण्याचे आवाहन केले.
त्याचप्रमाणे मागील निवडणुकीत कमी मतदान झाले आहे, अशा विभागांमध्ये मतदार जनजागृती करण्याबाबत विशेष भर देण्यात येत असून मतदानाची टक्केवारी वाढविण्याकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. याचाच एक भाग म्हणून यादवनगर ऐरोली परिसरात घराघरात स्वीप कार्यक्रमांतर्गत जनजागृती करण्यात आली. तसेच तेथील रिक्षा स्टँडच्या ठिकाणी रिक्षा चालकांची ओवाळणी करुन मतदानाचे आवाहन करण्यात आले. याशिवाय परिसरात रिक्षाद्वारे आवाहन करण्यात आले.
नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे स्वीप नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली स्वीप नोडल अधिकारी तथा उपायुक्त अभिलाषा म्हात्रे आणि स्वीप नोडल अधिकारी तथा सहा.आयुक्त सागर मोरे यांच्या माध्यमातून स्वीप पथकांच्या वतीने विविध माध्यमांतून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. अगदी दिवाळी सणातही समुहाने साजऱ्या झालेल्या दिवाळी उत्सवात कार्यक्रमांठिकाणी जाऊन मतदार जनजागृती केली.