नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांवर लवकरच सरकते जिने
नवी मुंबई : बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना विविध व्याधी, गुडघे दुखीचा त्रास असतो. अशा ज्येष्ठ नागरिकांना या वयात त्यांना रेल्वे स्थानकातील जिना चढताना होणाऱ्या वेदना प्रचंड असतात. तसेच दिव्यांगांना जिने चढताना प्रचंड त्रास होतो. त्यामुळे नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर (वाशी, तुर्भे, सानपाडा, जुईनगर, नेरुळ, सीवुडस्, बेलापूर, दिघा, घणसोली, कोपरखैरणे, ऐरोली, रबाले, आदि) सरकते जिने लवकरात लवकर बसवावे, अशी मागणी ‘मनसे'चे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने ‘सिडको'च्या मुख्य अभियंता शीला करुणाकरण यांच्याकडे केली आहे.
मुख्य अभियंता शीला करुणाकरण यांनी सुध्दा याबाबत सकारात्मकता दाखवली. तसेच ‘रेल्वे'शी याबाबत पाठपुरावा करुन लवकरात लवकर कार्यवाही करु, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.
नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांवर जे जिने आहेत तिथून चालताना ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास होतो. यासंदर्भात मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांनी ‘मनसे'कडे परिवर्तन यात्रेत मागणी केली होती. रेल्वे स्थानकांवर सरकते जिने असावेत. जेणेकरुन जेष्ठ नागरिकांना दिलासा मिळेल, असे गजानन काळे यांनी सांगितले.
दरम्यान, सरकते जिने रेल्वे स्टेशन वर बसविण्याबाबत ‘सिडको'कडून हालचाल सुरु केल्याने नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
‘मनसे'च्या शिष्टमंडळात शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या समवेत शहर सचिव सचिन कदम, पालिका कामगार सेना शहर अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, विभाग अध्यक्ष निखिल गावडे, आदि उपस्थित होते.