दिवाळे गावात आज बहिरीनाथ देवाचे आगमन
वाशी : वर्षभर खोल समुद्रात वास्तव्यास असणाऱ्या बहिरीनाथ देवाचे दिवाळीमध्ये दिवाळे गावात आगमन होते. त्यानंतर तीन दिवस दिवाळे गावात बहिरीनाथ उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे बहिरीनाथ देवाच्या आगमनासाठी दिवाळे गावात कोळी बांधवांची लगबग सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.
बहिरीनाथाच्या उत्सवाला आज ३१ ऑवटोबर पासून प्रारंभ होणार असून, उद्या १ नोव्हेंबर रोजी सकाळी बहिरीनाथाचा विधिव्रत अभिषेक आणि पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाच्या वेळी वर्षभर समुद्रात राहणारा आपला लाडका देव येत असल्याने, दिवाळे गावात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. एकीकडे दिवाळी सणाची धामधूम; तर दुसरीकडे बहिरीनाथ देवाचा तीन दिवस चालणारा उत्सव. या उत्सवात देवाच्या दर्शनाला; तसेच नवस बोलण्यासाठी नवी मुंबई, मुंबई, पनवेल, ठाणे येथून हजारो भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळते. चमत्कार वाटावा अशा प्रकारे घारापुरी बेटाजवळील समुद्रातून बहिरीनाथाची मूर्ती शोधून, ती होडीने दिवाळे गावात आणली जाते. त्यानंतर दिवाळे गावात दिवाळी उत्सव सुरु होत असल्याची २५० वर्षांपेक्षा अधिक वर्षे जुनी प्रथा असल्याचे दिवाळे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
नरक चतुर्दशी दिवशी दिवाळे गावातील ३०० पेक्षा अधिक तरुण ३५ ते ४० होड्या घेऊन बहिरीनाथ देवाला गावात आणायला घारापुरी बेटाजवळील समुद्रात जातात. समुद्रात बुडी मारुन गावातील तांडेल कुटुंबातील पुरुष समुद्राखालून देवाची मूर्ती शोधून काढून होडीत आणतो. बहिरीनाथ देवाची मूर्ती केवळ तांडेल कुटुंबातील पुरुषांनाच सापडते, अशी आख्यायिका आहे. बहिरीनाथाची देवाला अंघोळ घालून, शेंदूरलेपन करुन पालखीत बसवून मिरवणुकीने देवळात आणले जाते.
बहिरीनाथ उत्सवात रात्री भजन-कीर्तनात, पारंपरिक कोळीगीतांनी देवाची आळवणी करण्यात येते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवाला सकाळी अभिषेक घालून सायंकाळी पालखीत बसवून मोठ्या धामधुमीत ग्रामप्रदक्षिणा करण्यात येते. नवसाला पावणारा देव अशी ख्याती असणाऱ्या बहिरीनाथाची देवाला मागील वर्षी बोललेले नवस पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजल्यापासून फेडायला आणि नवीन नवस बोलायला भाविकांची मंदिरात अलोट गर्दी होते. केवळ नवी मुंबईतील नव्हे तर पनवेल, उरण, ठाणे, मुंबई, कल्याण येथून हजारो भक्तगण बहिरीनाथ देवाच्या दर्शनाला येतात. देवाला दिवाळी फराळासोबत नवस केलेल्या विविध वस्तू अर्पण केल्या जातात. त्यानंतर दुपारी १ वाजताच्या सुमारास देवाला पालखीत बसवून, वाजत-गाजत बंदरातील होडीत बसवून गावकरी आणि भाविक भक्तिभावाने बहिरीनाथ देवाला निरोप देतात.
दिवाळे गावासाठी खरी दिवाळी ३ दिवसांचीच असते. दिवाळे गावात बहिरीनाथ देवाच्या आगमनापासून दिवाळी सुरु होते अन् देवाच्या विसर्जनानंतर दिवाळी समाप्त होते, अशी दिवाळे ग्रामस्थांची भावना आहे. अभंगस्नानाच्या दिवसापासून सलग तीन दिवस फटावयांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात येते. - शरद कोळी, ग्रामस्थ - दिवाळे गाव, नवी मुंबई.