१.०२ कोटीचे कोकेन जप्त; नायजेरीयन नागरिक जेरबंद
नवी मुंबई : उलवे परिसरात राहून अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या नायजेरीयन नागरिकाला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा मारुन अटक केली आहे. जार्ज ओकान्टे डासिल्व्हा (३५) असे या नायजेरीयन नागरिकाचे नाव असून त्याच्याकडून तब्बल १.०२ कोटी रुपये किंमतीचे कोकेन जप्त केले आहे. या नायजेरीयन नागरिकाविरोधात यापूर्वी मुंबईतील नवघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल असून या आरोपीचा इतर कोणी साथीदार आहेत का? तसेच त्याने सदर अंमली पदार्थ कोठून प्राप्त केला? याचा गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे.
उलवे, सेक्टर-२५ए मधील आर.एन. हाईटस् बिल्डींगमध्ये राहणारा एक आफ्रिकन नागरिक अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती अनैतिक मनावी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मराज बनसोडे यांच्या मार्गदशनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील, शरद भरगुडे आणि त्यांच्या पथकाने २८ ऑवटोबर रोजी दुपारी उलवे, सेक्टर-२५ ए मधील आर. एन. हाईटस् या बिल्डींग मधील नायजेरीयन नागरिक राहत असलेल्या पलॅटवर छापा मारला. या कारवाईत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सदर पलॅटमध्ये राहणाऱ्या जॉर्ज डिसिल्व्हा याला ताब्यात घेतले.
त्यानंतर पोलिसांनी झडती घेतली असता बेडरुममध्ये मरुन रंगाच्या बॅगमध्ये ४१० ग्रॅम वजनाचा १ कोटी २ लाख ५० हजार रुपये किंमतीचे कोकेन तसेच १ मोबाईल फोन, काळ्या रंगाचा १ टॅनीटा कंपनीचा वजन काटा, कात्री, १० पारदर्शक प्लास्टीकच्या पिशव्या, १ स्काय बॅग असा मुद्देमाल सापडला. त्यामुळे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अंमली पदार्थ आणि इतर साहित्य जप्त केला आहे. तसेच आरोपी जॉर्ज डिसिल्व्हा याच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याची ३१ ऑक्टोबर पर्यत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास उलवे पोलीस करीत आहे.