अंमली पदार्थ विरोधी कक्षाची खारघरमध्ये धडक कारवाई
27 लाखांचे मेफेड्रॉन ड्रग्ज व मद्यसाठा जप्त
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी पहाटे खारघरमध्ये दोन रो-हाऊसवर छापे मारुन ड्रग्स तसेच दारूच्या पार्टीसाठी जमलेल्या 20 नायजेरीयन नागरिकांची धरपकड केली आहे. यात 13 पुरुष आणि 7 महिलांचा समावेश असून त्यांच्याकडुन तब्बल 26 लाख 77 हजार रुपये किंमतीचे 107 ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन व 22 हजार रुपये किंमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे. या कारवाईत पकडण्यात आलेल्या 13 नायजेरियन नागरीकांनी कोणताही भाडेकरार केला नसल्याचे तसेच सी फॉर्म देखील भरला नसल्याचे तपासात आढळुन आले आहे. त्यानुसार या नायजेरीन नागरिकांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात दारु बंदीसह एनडीपीएस ऍक्ट, परदेशी नागरीक कायदा तसेच रजिस्ट्रेशन ऑफ फॉरेनर्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करुन सर्वांना अटक करण्यात आली आहे.
खारघर सेक्टर-7 मधील लेमन किचन व जेमिनी किचन या दोन नाजयेरीयन किचनमध्ये ड्रग्स तसेच दारुच्या पाटर्या सुरु असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले, यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, पोलीस निरीक्षक अजय भोसले, हनिफ मुलानी, अश्विनी पाटील, तसेच गुन्हे शाखेतील 150 महीला व पुरुष पोलीस अधिकारी व अंमलदार, दंगल नियंत्रण पथक व फॉरेन्सिक टिमने सोमवारी पहाटेच्या सुमारास या दोन्ही किचनवर छापा टाकला. यावेळी दोन्ही किचनमध्ये 20 नायजेरीयन पुरुष व महिला हे पार्टी करीत असताना आढळुन आले. त्यामुळे पोलिसांनी सर्व नायजेरीयन नागरीकांना ताब्यात घेतले.
यावेळी अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या झडतीत सदर ठिकाणी तब्बल 26 लाख 77 हजार 500 रुपये किंमतीचे 107 ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन व 22,490 रुपये किंमतीचा मद्यसाठा आढळुन असून पोलिसांनी सदरचे अमली पदार्थ व मद्याचा साठा जफ्त केला आहे. या कारवाईत पकडण्यात आलेल्यापैकी 13 नायजेरीयन नागरीकांनी कोणताही भाडे करार न करता तसेच सी फॉर्म न भरता खारघरमध्ये लेमन किचन व जेमिनी किचन चालवत असल्याचे तपासात आढळुन आले आहे. त्यामुळे पोलिसांनी या 13 नायजेरीयन नागरीकां विरोधात परदेशी नागरीक कायदा व रजिस्ट्रेशन ऑफ फॉरेनर्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच सदर दोन्ही किचनच्या जागा मालकाना देखील या गुन्हयांमध्ये सह आरोपी केले आहे. न्यायालयाने या सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
पोलिसांकडुन नागरीकांना आवाहन
नागरीकांनी आपले घर भाडयाने देण्यापूर्वी भाडेकरुंच्या पार्श्वभूमीची माहिती करुन त्याबाबत खात्री करून त्यांना भाडयाने घर द्यावे. विशेषत परदेशी नागरिकांना घर भाडयाने देण्यापूर्वी त्यांचे पासपोर्ट व सी-फॉर्मची खात्री करावी. तसेच त्यांच्या सोबत कायदेशीर भाडे करारनामा करावा. तसेच वेळोवेळी त्या ठिकाणी भेट देवून आपल्या जागेचा बेकायदेशीर कामासाठी वापर होत नाही, याची खात्री करावी. सदर ठिकाणी बेकायदेशीर कृत्य चालू असल्यास अशा गैरकृत्याची माहिती स्वत: पोलिसांना द्यावी असे आवाहन पोलिसांकडुन करण्यात आले आहे.