कल्याण जिल्ह्यातील जागा वाटपाबाबत ‘काँग्रेस'ची नाराजी

डोंबिवली : कल्याण पूर्व, पश्चिम, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली या चारही विधानसभा मतदार संघात ‘महाविकास आघाडी'ने ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष'मधील उमेदवार देण्याचे निश्चित करत जाहीर केले. मात्र, चारही विधानसभा क्षेत्रांपैकी एकही जागा ‘काँग्रेस'च्या वाट्याला आली नाही. वास्तविक डोंबिवली विधानसभा मतदारसंघाची जागा अनेक वर्षापासून ‘काँग्रेस'ला दिली जाते. मात्र, ‘महाविकास आघाडी'ने ‘काँग्रेस'चा का विचार केला नाही? असा प्रश्न ‘काँग्रेस'चे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी उपस्थित केला.

पत्रकारांशी संवाद साधताना कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे म्हणाले, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘काँग्रेस'ने उपोषण, आंदोलन, मोर्चा काढले होते. या चारही विधानसभा मतदारसंघात ‘काँग्रेस'ला मानणारा जो मतदार आहे, तो प्रचंड नाराज झाला आहे.

काँगेस जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम करत असताना माझ्याबरोबर युथ काँग्रेस, महिला काँग्रेस, वरिष्ठ सरचिटणीस, उपाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा देणार आहोत. अजुनही आम्हाला अपेक्षा आहे की, महाराष्ट्रात काही जागा वाटपामध्ये बदल झाला आहे, त्याप्रमाणे कल्याण जिल्ह्यात एकतरी जागा ‘काँग्रेस'ला मिळेल. मात्र, तसे झाले नाही तर कल्याण-डोंबिवली मध्ये ‘महाविकास आघाडी'च्या उमेदवाराचे काम आम्ही करणार नाही. आतातरी आम्ही हमी देऊ शकत नाही, असे सचिन पोटे यांनी सांगितले.

कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्व या दोन विधानसभा मतदार संघात ‘काँग्रेस'चे निवडून येण्याचे निकष होते, तेच आम्ही मागितले होते. मात्र, ‘शिवसेना'कडे सक्षम उमेदवार नसताना, स्थानिक उमेदवार नसताना त्यांनी आग्रहाने या जागा मागून त्या पडण्यासाठी ते लढत आहेत का? असे याबाबत शंका येत असल्याचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे म्हणाले.

सदर पत्रकार परिषद प्रसंगी ‘काँग्रेस'च्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सलीम शेख, राजाभाऊ पातकर, मुन्ना तिवारी, विमल ठक्कर, युवक जिल्हाध्यक्ष जपजीत सिंह उर्फ बॉबी, राकेश मुथा तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

आ. मंदाताई म्हात्रे यांचा ‘महायुती'तर्फे उमेदवारी अर्ज दाखल