स्वच्छ, पर्यावरणशील, प्लास्टिकमुक्त दिवाळीसाठी नवी मुंबईकरांना आवाहन
नवी मुंबई : नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे स्वच्छतेमध्ये नेहमीच आघाडीवर असणाऱ्या नवी मुंबई शहरातील जागरुक नागरिकांनी भारतातील सर्वात मोठा सण असणारा दिवाळी उत्सव ‘पर्यावरणशील, फटाकेमुक्त-प्लास्टिकमुक्त' साजरा करण्याविषयी नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले असून यादृष्टीने महापालिकाही तशा प्रकारची कार्यवाही करीत आहे.
दिवाळीपूर्वी नागरिक मोठ्या प्रमाणात आपल्या घराची साफसफाई करत असतात. अशावेळी नागरिकांनी आपल्याला नको असलेल्या, टाकून देणार असलेल्या वस्तू नवीमुंबई महापालिकेच्या वतीने शहरात ९२ ठिकाणी उभारलेल्या ‘थ्री आर' सेंटरमध्ये आणून ठेवाव्यात. जेणेकरुन त्या गरजूंपर्यंत पोहोचून त्यांची दिवाळी आनंदात जाईल. तसेच उर्वरित कचऱ्याची विल्हेवाट लावणे सोयीचे ठरेल. असे आवाहन करण्यात आले आहे.
शहर स्वच्छ ठेवण्यात स्वच्छतामित्र आणि स्वच्छतासखींचे फार मोठे योगदान असून कचऱ्याचे वर्गीकरण करण्यातून तसेच महापालिकेने निश्चित केलेल्या योग्य जागी कचरापेट्यांमध्ये योग्य प्रकारे कचरा टाकण्यातून आपल्या स्वच्छताकर्मींना करावे लागणारे अतिरिक्त काम कमी करुन दिलासा द्यावा. तसेच कोणत्याही प्रकारे उघड्यावर कचरा जाळून वायू प्रदूषण वाढू न देण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आलेले आहे.
दिवाळीपूर्वी शहर स्वच्छतेची विशेष सखोल स्वच्छता मोहीम आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून शहरातील मुख्य मार्गांवरील दुभाजकांचे कॉर्नर्स आणि पदपथ येथील गाळ सुकून झालेली माती काळजीपूर्वक साफ करण्यात येत आहे. याकरिता मॅकेनिकल स्विपींग वाहने तसेच वॉटर स्प्रेईंग वाहने यांचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. यामध्ये अग्निशमन विभागाचेही विशेष सहकार्य मिळत आहे. पावसाळी कालावधीत पावसासोबत वाहून आलेली माती रस्त्यांच्या कडेला गाळ स्वरुपात जमा होते. पाऊस थांबल्यानंतर वाहनांच्या रहदारीमुळे हवेत उडून प्रदुषणात वाढ होते. सदर बाब लक्षात घेत रस्त्यांच्या कडेला साचलेली माती जमा करण्यात येत असून त्यानंतर या रस्त्यांची जेटींग मशीनद्वारे पाणी मारुन सफाई करण्यात येत आहे. यासाठी वापरण्यात येणारे पाणी मलप्रक्रिया केंद्रातील शुध्दीकरण केलेले प्रक्रियाकृत पाणी असून यामुळे रस्ते सफाईसोबतच पिण्याच्या पाण्याची बचतही केली जात आहे.
या अंतर्गत नेरुळ विभागात राजीव गांधी उड्डाणपूल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सेवटर-३ बस डेपो- जय भवानी सर्कल पर्यंत रस्ते स्वच्छता आणि रस्ते धुणे अशा दोन्ही प्रकारे विशेष स्वच्छता करण्यात आली. त्याचप्रमाणे अवजड वाहनांची नियमित वर्दळ असणाऱ्या बेलापूरमधील आम्रमार्गावर उरण फाटा ते नमुंमपा मुख्यालय भागाची सखोल रस्ते सफाई करण्यात आली. यासोबतच ठाणे बेलापूर मार्ग, कोपरखैरणे-रबाले एमआयडीसी मार्ग, महापे शिळफाटा मार्ग, वाशी कोपरखैरणे मार्ग, घणसोली पामबीच मार्ग, पटणी मार्ग अशा मुख्य मार्गांची रस्ते साफसफाई आणि धुणे अशा दोन्ही प्रकारे सखोल स्वच्छता करण्यात आली आहे. या भागात दररोज सकाळ, संध्याकाळ चालण्यासाठी येणाऱ्या महिला आणि पुरुषांनी महापालिकेच्या या सखोल स्वच्छता मोहिमेची प्रशंसा केली असून यामुळे धुळीचे प्रमाण कमी झाल्याचे अभिप्राय दिले आहेत.
दिवाळीत वायू आणि ध्वनी प्रदुषणाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांनी दिवाळी फटाकेमुक्त साजरी करावी, असे आवाहन यापूर्वीच करण्यात आले आहे. नेहमी सरासरी ९१ इतका असणारा हवा गुणवत्ता निर्देशांकदिवाळी सणादरम्यान फटाक्यांमधून निघणाऱ्या विषारी घटकांपासून उद्भवणाऱ्या वायू प्रदूषणामुळे सरासरी २१२ इतका वाढत असल्याचे निदर्शनास येते. या वाढत्या वायू प्रदुषणामुळे नागरिकांना श्वसनासंबंधीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्या अनुषंगाने १२५ डेसीबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री किंवा वापर बेकायदेशीर असल्याचे नमूद करीत बेरियम सॉल्ट, लिथीयम, अर्सेनिक, लीड, मर्क्युरी यासारखे घटक असणारे फटाके वापरण्यास बंदी असल्याचेही नमुंमपा मार्फत सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार फटाके विक्रेत्यांनी बंदी असलेले फटाके विक्री करावयाची नाही. तसेच परवानगी असलेल्या फटाक्यांची महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी परवानगी घेऊनच विक्री करावयाची आहे, असे महापालिका तर्फे स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संध्याकाळी ७ ते रात्री १० या वेळेतच फटाके वाजवावेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहेत. तथापि फटाक्यांमुळे होणारे वायू आणि ध्वनी प्रदुषण लक्षात घेऊन नागरिकांनी ‘फटाकेमुक्त दिवाळी' साजरी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनीही पर्यावरणशील दृष्टीकोन दाखवत दिवाळीच्या सजावट साहित्यात प्लास्टिकचा वापर टाळून कागद, कापड अशा पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करावा. तसेच प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा. ‘स्वच्छता हीच लक्ष्मी' अशी भारतीय संस्कृतीची शिकवण असून नवी मुंबईकर नागरिकांनी ‘फटाकेमुक्त, प्लास्टिकमुक्त, स्वच्छ, सुंदर, पर्यावरणशील दिवाळी साजरी करावी, असे आवाहन नवी मुंबईकर नागरिकांना करण्यात येत आहे.
- डॉ. कैलास शिंदे, आयुवत-नवी मुंबई महापालिका.