फटाके बाजूला ठेवा, हरित दिवाळी साजरी करुया
उल्हासनगरकरांसाठी पर्यावरण विभागाचे जाहीर आवाहन
उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील सर्व फटाके विक्रेते आणि फटाक्यांचा वापर करणाऱ्या नागरिकांना प्रदुषणाचा धोका कमी करण्यासाठी आणि सुरक्षित दिवाळी साजरी करण्यासाठी पर्यावरण विभागाने अत्यंत महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. याबाबत जाहीर आवाहन उल्हासनगर महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी प्रसिध्द केले आहे.
भारत सरकारच्या अधिसुचनेनुसार १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि वापर बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे ध्वनी प्रदुषणाला आळा बसणार असून शहरातील शांतता आणि नागरिकांची आरोग्य सुरक्षा कायम राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फटाक्यांमध्ये बेरियम सॉल्ट, लिथियम, अर्सेनिक, लेड, मर्क्युरी यासारखे विषारी घटक असलेल्या फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या घटकांमुळे वातावरणात हानिकारक वायू तयार होतात, जे प्राणी, वनस्पती आणि मानवांसाठी गंभीर धोका निर्माण करु शकतात.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व फटाका विक्रेत्यांनी विस्फोटक अधिनियम १८८४ आणि विस्फोटक नियम २००८ यानुसार आवश्यक त्या सुरक्षा उपायांची काटेकोर अंमलबजावणी करावी. शहरातील विक्रेत्यांना प्रशासनाने सूचित केले आहे की, फटाक्यांची विक्री केवळ महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणीच परवानगी घेऊन करावी.
महाराष्ट्र शासनाने ‘माझी वसुंधरा अभियान ५.०' आणि ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२५' अंतर्गत सर्व सण-उत्सव फटाकेमुक्त, प्लॅस्टिकमुक्त, कचरामुक्त आणि पर्यावरणपूरक (ग्रीन फेस्टिवल) पध्दतीने साजरे करण्याचे आवाहन केले आहे. पर्यावरणपूरक दिवाळीसाठी नागरिकांनी फटाक्यांचा वापर टाळावा. तसेच कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा आणि विघटनशील आणि पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तुंचा सण समारंभात वापर करावा. या अभियानाच्या माध्यमातून दिवाळीची परंपरा टिकवून ठेवत पर्यावरणाचे रक्षण करण्यावर भर देण्यात आला आहे.
दरम्यान, आगामी दिवाळीत प्रत्येकाने पर्यावरणपूरक पध्दतीने सण साजरा करावा आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशा शुभेच्छा पर्यावरण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. या दिवाळीत उल्हासनगरकरांनी एकत्र येऊन हरित आणि सुरक्षित दिवाळी साजरी करुन एक आदर्श निर्माण करावा, हेच पर्यावरण विभागाचे उद्दिष्ट असल्याचे जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे यांनी सांगितले.
यंदा उल्हासनगरकरांनी फटाके फोडण्याऐवजी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी. शहराच्या आरोग्यासाठी हानिकारक ध्वनी, हवेतील प्रदुषण आणि विषारी घटकांपासून शहराला वाचविणे आपले कर्तव्य आहे. दिवाळीच्या शुभप्रसंगी प्रदुषण टाळण्यासाठी सर्वांनी फटाके फोडणे टाळावे आणि पर्यावरणपूरक पध्दतीने दिवाळी साजरी करावी. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी उल्हासनगर महापालिकेच्या नेतृत्वात फटाक्यांच्या अवैध साठ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अनधिकृत फटाका गोदामांवर छापे मारण्यात येतील आणि सर्व फटाका विक्रेत्यांच्या परवान्याची तपासणी केली जाईल. शहरातील नागरिकांनी प्रदुषण विभागाच्या या आवाहनाचे पालन करुन पर्यावरणाच्या संरक्षणात हातभार लावावा.
-विकास ढाकणे, आयुवत-उल्हासनगर महापालिका.