‘एमआयडीसी'ची भरती प्रकिया रखडल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण

वाशी : ‘एमआयडीसी'मार्फत ऑगस्ट २०२३ मध्ये  अ, ब, क श्रेणीतील एकूण ८०२ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यात सर्वाधिक २२१ कर्मचारी अग्निशमन दलात भरती केले जाणार आहेत. मात्र, सदर भरती प्रक्रिया रखडल्याने कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत असून सर्वाधिक कामाचा ताण अग्निशमन दलावर पडत आहे.

नवी मुंबईतील कळवा ते नेरुळ अशा ५३९.२५ हेक्टर जागेवर औद्योगिक वसाहत वसली असून यात ४  हजार उद्योग आहेत. सदर सर्व परिसराचा कारभार ‘एमआयडीसी'च्या महापे प्रादेशिक कार्यालयातून पहिला जातो. यासाठी या ठिकाणी प्रादेशिक अधिकारी, कार्यकारी अभियंता, उप अभियंता तसेच सहाय्यक अभियंता कार्यरत आहेत. मात्र, या ठिकाणी ६ ते ७ सहाय्यक अभियंता कमी आहेत. हीच परिस्थिती ‘एमआयडीसी'च्या इतर प्रादेशिक कार्यालयात आहे.

त्याचप्रमाणे येथील औद्योगिक वसाहतीतील आगींवर नियंत्रण मिळावे म्हणून ‘एमआयडीसी'ने औद्योगिक वसाहती करिता तुर्भे, पावणे आणि रबाले अशा ३ अग्निशमन दलाची उभारणी केली आहे. यातील पावणे अग्निशमन केंद्र ‘ठाणे-बेलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन'तर्फे चालवले जात असून त्यास एमआयडीसी अनुदान देते. तिन्ही केंद्रात अवघे ४७ कर्मचारी तैनात आहेत. यात तुर्भे १३, पावणे१६ आणि रबाले येथे १८ कर्मचारी कार्यरत आहेत. याठिकणी एकूण ९ वाहने उपलब्ध आहेत. मात्र, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ खूपच अल्प आहे. प्रत्येकी वाहनावर ६ कर्मचारी असणे गरजेचे आहे. तसेच वाहन चालकांची सुध्दा कमतरता आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना ८ तासाची ड्युटी करुन १६ तास सजग रहावे लागते. परिणामी, या कर्मचाऱ्यांवर देखील कामाचा मोठा ताण पडत आहे.

त्यामुळे औद्योगिक भागात एखादी आगीची मोठी घटना घडली तर येथील अग्निशमन दल अपुरे पडत आहे. त्यामुळे अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांवर पडणारा ताण कमी करण्यासाठी ‘एमआयडीसी'ने सन २०२३ मध्ये एवूÀण २२१ जणांची भरती प्रकिया राबविण्यास सुरुवात केली. मात्र, सदर भरती प्रकिया रखडल्याने विद्यमान कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे.

‘एमआयडीसी'च्या एमएमआर क्षेत्रातील एकंदरीत कार्यालयात आणि अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या पाहता महाऑनलाईन मार्फत ८०२ पदांसाठी भरती प्रकिया राबविण्यात आली असून त्यात २११ पदे अग्निशमन दलासाठी आहेत. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव सदर भरती प्रकिया थांबविण्यात आली असून उच्च स्तरावर निर्णय होताच पात्र झालेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन केंद्र निहाय कर्मचारी दिले जातील.
-मिलिंद ओगले, सहाय्यक केंद्र प्रमुख, टीटीसी अग्निशमन केंद्र, नवी मुंबई. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल मध्ये ‘स्वच्छ दिवाळी-शुभ दिवाळी' मोहीम