राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आ. राजू पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज
डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातून ‘मनसेे'चे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी २४ ऑक्टोबर रोजी डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुल येथे उमेदवारी अर्ज भरला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अविनाश जाधव, अभिजित पानसे, राजू पाटील यांचे मोठे भाऊ रमेश पाटील, मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत, हर्षद पाटील, अरुण जांभळे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
आ. राजू पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राज ठाकरे यांनी स्वतः गाडी चालवत ते उमेदवार राजू पाटील यांचे सारथी बनले. यावेळी पत्रकारांशी बोलताना उमेदवार राजू पाटील म्हणाले, आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आणि लकी आहे. आजच्या दिवशी २०१९ रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला होता. राज ठाकरे माझ्याबरोबर येथे आल्याने आनंदी वातावरण आहे.
तर ठाणे येथून ‘शिवसेना ठाकरे गट'तर्फे शिवसेना नेते तथा माजी खासदार राजन विचारे तर ‘महायुती'तून संजय केळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल मनसे उमेदवार अविनाश जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, दोन्ही उमेदवार मागच्या निवडणुकीत एकत्र होते आणि एकच गाडीतून फिरुन माझ्या विरोधात प्रचार करत होते. आता ते दोन्ही उमेदवार आता एकमेकांच्या विरोधात प्रचार करणार आहेत. तर ५ वर्ष ‘मनसे'ने जे काम केले आहे. विविध विषयांवर आंदोलने, पाणी प्रश्न, कचरा प्रश्न अशा नागरी समस्या सोडविल्या आहेत, जनतेसमोर जाताना हीच ५ वर्ष केलेली कामे घेऊन जाणार आहोत, जनतेची साथ मागणार आहोत, मते मागणार आहोत. पुढील ५ वर्ष शहरासाठी उत्तम काम करण्याचे आहे. मला खात्री आहे की, जनता आमच्या सोबत उभी राहतील. मागच्या काळात आघाडी आणि युती झाल्याचे जनतेने पाहिले आहे. त्यामुळे जनतेच्या मनात आघाडी आणि युतीबद्दल प्रचंड नाराजी आहे. तिसरा पर्यंत म्हणून जनता ‘मनसे'कडे पाहत आहे. त्यामुळे आम्ही पूर्ण खात्रीने विधानसभा निवडणुकीला समोर जावू आणि विजय मिळवू, असा विश्वास अविनाश जाधव यांनी व्यक्त केला.