आगरी-कोळी संस्कृती भवनाचा वापर शासकीय कार्यक्रमांसाठी न करण्याची मागणी
वाशी : नवी मुंबई शहरातील मूळ निवासी आगरी-कोळी बांधवाच्या संस्कृतीचे जतन करण्याच्या दृष्टीने सिडको मार्फत पामबीच मार्गावर नेरुळ येथे भव्य आगरी-कोळी भवन उभारण्यात आले आहे. परंतु, या वास्तूचा वापर शासकीय कार्यक्रमांसाठी अधिक होत असल्याने स्थानिक आगरी-कोळी समाजाला हक्काच्या वास्तूचा वापर करता येत नसल्याची खंत अखिल आगरी-कोळी प्रबोधन ट्रस्ट तर्फे व्यक्त करण्यात आली आहे. तसेच यापुढे कोणत्याही शासकीय कार्यक्रमांचे नियोजन करताना केवळ आगरी - कोळी संस्कृती भवन येथेच कार्यक्रम न घेता ते इतरत्रही घ्यावेत, अशी मागणी अखिल आगरी-कोळी प्रबोधन ट्रस्ट तर्फे सिडको प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नवी मुंबई आणि पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात दिघा ते बेलापूर आणि खारघर ते पनवेल परिसरात आगरी-कोळी समाजाची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. नवी मुंबईतील स्थानिक रहिवासी असलेल्या या भूमिपुत्रांच्या शेतजमिनीवर नवी मुंबई शहर वसले आहे. शहरीकरणामुळे येथील मूळ संस्कृती लोप पावली आहे. यासंदर्भात प्रकल्पग्रस्तांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सिडको प्रशासनाने १३ वर्षांपूर्वी नेरुळ येथे आगरी-कोळी भवन बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २०११ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या भवनचे शानदार उद्घाटन करण्यात आले.
आगरी-कोळी भवनामुळे आगरी-कोळी समाजाची मूळ संस्कृतीची शहरवासीयांना ओळख राहील, असा आगरी-कोळी भवन उभारण्याचा उद्दात हेतू होता. आगरी-कोळी भवनाची वास्तू सुबक आणि आकर्षक असली तरी या वास्तूमध्ये बहुतांश कार्यक्रम शासकीय तसेच निवडणुकांसंदर्भात घेतले जातात. त्यामुळे नवी मुंबई, पनवेल मधील आगरी-कोळी समाजाला आपले कार्यक्रम खाजगी हॉल मध्ये घ्यावे लागतात. त्यासाठी त्यांना अधिकचा आर्थिक भुर्दंड देखील सोसावा लागतो आहे. आगरी-कोळी वास्तू बांधून व्हावी, यासाठी आगरी कोळी समाज आणि ट्रस्ट कडून सिडको कडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर आगरी-कोळी वास्तू उभी राहिली. परंतु, शासनाच्या निवडणूक तसेच अन्य कार्यक्रमांसाठी या वास्तूचा सातत्याने वापर होत असल्याने शासनाच्या कार्यक्रमांच्या कालावधीत येथील भूमीपुत्रांना दुसऱ्या पर्यायी जागेचा मार्ग शोधावा लागत असून, यासाठी फार मोठा भुर्दंड येथील भुमिपुत्रांना मोजावा लागत आहे. कोरोना काळात कोव्हीड सेंटर सुरु करण्यात आले होते. त्यामुळे ते दोन वर्षे बंद ठेवण्यात आले होते.
नवी मुंबई महापालिका आणि सिडको, महाराष्ट्र शासनाच्या शेकडो वास्तू असताना भूमीपुत्रांच्या या एकाच वास्तूत शासनाचे सातत्यपूर्ण कार्यक्रम घेण्याचे प्रयोजन का केले जाते?, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. आगरी-कोळी भवन वास्तू निवडणूक प्रक्रियेसाठी वापरू नये त्यासाठी इतरत्र कुठल्याही वास्तूचा वापर करावा, अशी मागणी अखिल आगरी-कोळी प्रबोधन ट्रस्ट तर्फे सिडको प्रशासनाकडे करण्यात आली आहे.