जखमी चालकाच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च प्रशासनाने करावा
नवी मुंबई : ऑनड्युटी असताना अपघातात जखमी झालेल्या नमुंमपा परिवहन उपक्रमातील चालकाच्या सर्व वैद्यकीय उपचाराचा खर्च उचलून प्रशासनाने त्यास भरपगारी रजा देण्याची मागणी ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'च्या वतीने महापालिका आयुक्त आणि परिवहन व्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमातील (एनएमएमटी) आसुडगांव डेपोतील चालक राजकुमार सोनकांबळे (बक्कल नंबर १५८६) १६ ऑक्टोबर २०२४ रोजी बस क्र.९८६२, मार्गिका क्र. ५९वर चालक म्हणून कार्यरत असताना आद्य तलाव येथे ड्रायव्हर साईटचा बसचा दरवाजा अचानक उघडला गेला. त्यामुळे चालक राजकुमार सोनकांबळे याने तातडीने पुढील अपघात टाळण्यासाठी सावधगिरी बाळगून दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. पण, या प्रयत्नामध्ये बाहेरच्या बाजूला तोल गेल्याने चालक सोनकांबळे चालत्या बसमधून खाली पडले गेले. राजकुमार सोनकांबळे यांच्या डाव्या पायाला जबर मार लागला असून तपासणीअंती डॉक्टरांकडून ३ जागी फ्रॅक्चर सांगण्यात आले आहे. तसेच त्यांच्या पायात रॉड टाकण्यास डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
चालक सोनकांबळे वाशी, सेक्टर-१० मधील प्रथम संदर्भ रुग्णालयात उपचार घेत आहेत. सोनकांबळे यांची भेट घेण्यासाठी ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'चे पदाधिकारी सचिव मंगेश गायकवाड, नितिन गायकवाड, कांतीलाल चांदणे, शंकर सावंत आणि इतर पदाधिकारी वाशीतील रुग्णालयात गेले. त्यांची विचारपूस केली असता समस्येचे गांभीर्य या प्रतिनिधींच्या निदर्शनास आले. आज परिवहन उपक्रमाची वाहने व्यवस्थित नसताना तसेच वाहने दुरावस्थेत असतानाही चालवावी लागत आहेत. त्यातूनच असे अपघात घडत आहेत. मुळात नादुरुस्त सदोष वाहनमुळे चालक सोनकांबळे जखमी झाले आहेत. त्यांच्या शरीराला दुखापती झाल्या आहेत. सोनकांबळे यांचा अपघातामुळे होणारा सर्व वैद्यकीय खर्च महापालिका प्रशासनाने द्यावा. तसेच उपचारादरम्यान त्यांना कामावर येणे शक्य नसल्याने त्यांना या कालावधीतील वेतन देण्यात यावे, आदि मागण्यांच निवेदन ‘युनियन'च्या वतीने आयुक्त डॉ.कैलास शिंदे आणि परिवहन व्यवस्थापक योगेश कडूसकर यांना देण्यात आले. याप्रसंगी ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'चे सचिव मंगेश गायकवाड, मंगेश गायकवाड, कंत्राटी विभागाचे अध्यक्ष संजय सुतार, परिवहन विभाग अध्यक्ष नितीन गायकवाड, उपाध्यक्ष कांतीलाल चांदणे, राजू शेल्हाळकर, दीपक गावडे, आदि उपस्थित होते.