सानपाड्यातील ' सेव्हन्थ डेज ' शाळेने महापालिकेचा पदपथ ढापला ; सिडको सोसायटीतील ७५० कुटूंबांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
नवी मुंबई : सानपाडा येथील ' सेव्हन्थ डेज ' शाळेने नवी मुंबई महापालिकेचा पदपथ गिळंकृत करत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई करत शाळा व्यवस्थापनावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेचे प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ.राहुल गेठे यांच्याकडे पत्राद्वारे १८ ऑक्टोबर रोजी केली.
यावेळी मनसे प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या समवेत शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन खानविलकर, सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे, रस्ते आस्थापना व साधन सुविधा विभागाचे नवी मुंबई शहर संघटक संदीप गलुगडे, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे नवी मुंबई शहर संघटक सनप्रित तुर्मेकर, चित्रपट सेनेचे नवी मुंबई शहर संघटक अनिकेत पाटील, विद्यार्थी सेनेचे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष प्रतिक खेडकर, वाशी विभाग अध्यक्ष श्याम ढमाले, स्थानिक सोसायटीतील रहिवासी उपस्थित होते.
सानपाडा, सेक्टर-८ येथील ' सेव्हन्थ डेज ' या शाळेने आपल्या शाळेच्या मैदानाभोवती संरक्षण भिंत उभारली आहे. मात्र, हि संरक्षण भिंत उभारत असताना शाळेने नवी मुंबई महापालिकेचे पदपथ गिळंकृत करून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केले आहे. शाळेला लागूनच सिडकोच्या सोसायट्या आहेत. शाळेने पदपथ गिळंकृत केल्याने आजूबाजूच्या सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांना आता दिवसा-रात्री रस्त्यावरून पायी चालत जावे लागत आहे. त्यातच हा रस्ता वर्दळीचा असल्याने अरुंद रस्त्यामुळे येथे अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. याचा नाहक त्रास येथील सोसायटीतील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या ७५० कुटुंबियांना येथून पायी चालत येताना - जाताना आपला जीव मुठीत घेऊन चालावे लागत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे गजानन काळे यांनी सांगितले. याबाबत सानपाडा सेक्टर ८ येथील कोहिनूर, संकल्प, आदर्श, नवप्रेरणा, शिवशक्ती सोसायटीतील रहिवाशांनी मनसेकडे लेखी स्वरूपात तक्रारी केल्या आहेत.
गोरगरीब स्थानिक मराठी माणसाने रस्त्यावर व्यवसाय सुरू केला की, महापालिका कारवाई करते. मात्र, शाळेने तर चक्क येथे महापालिकेचा पदपथ गिळंकृत केला आहे. असे असतानाही महापालिका गप्प का ? असा सवाल गजानन काळे यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे रहिवाशांच्या तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ' सेव्हन्थ डेज ' शाळेने केलेल्या अनधिकृत बांधकामाची पाहणी करून शाळा व्यवस्थापनावर महापालिकेचा पदपथ गिळंकृत करून अतिक्रमण केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा. तसेच शाळेने केलेल्या अतिक्रमणावर तात्काळ महापालिकेचा हातोडा चालवून शाळेचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्याची मागणी गजानन काळे यांनी यावेळी केली.
गजानन काळे यांच्या पत्रानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ.राहुल गेठे यांनी तात्काळ मनपा तुर्भे 'डी ' विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी प्रबोधन मवाडे यांना फोन करून ' सेव्हन्थ डेज ' शाळेने केलेल्या अनधिकृत बांधकामाची पाहणी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.