उरण परिसरात रानडुकरांचा हैदोस!

उरण : यंदा परतीचा पाऊस भात पिके तयार होण्याच्या अखेरच्या वेळेला दररोज सायंकाळच्या वेळेला बरसल्याने भात पिके संकटात सापडली आहेत. या संकटात सापडलेल्या भात पिकांकडे आता जंगली रानडुकरांची वक्रदृष्टी असल्याने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे.

 भातशेती कापणीला आली असताना शेतात रानडुकरांचा हैदोस सुरु झाला असल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास कळपाने हल्ला करणारी रानडुकरे हिरावून नेत असल्याने रानडुकरांचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी उरण तालुक्यातील चिरनेर, कळंबुसरे, कोप्रोली, आवरे, साई, दिघाटी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.

पिकलेल्या शेतीची नासाडी करण्यासाठी येणाऱ्या रानडुकरांना पळवून लावण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर शेताची राखण करावी लागत आहे. यंदा सुरुवातीला म्हणजे लावणीसाठी पाऊस उत्तम झाला. मात्र, त्यानंतर पिके पोटरीला येण्याच्या वेळेला आणि भात कापणीच्या हंगामात परतीच्या पावसाने बरसण्याचे रंग दाखवायला सुरुवात केल्याने येथील शेतीवर संकट आले आहे. ऐन कापणीच्या मोसमात पाऊस दररोज सायंकाळी हजेरी लावत असल्यामुळे तयार भात पिके घरी आणायची तरी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असून, शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पावसाचा लहरीपणा कायमच राहिल्याने शेती व्यवसाय पूर्णपणे धोक्यात आला आहे.

दरम्यान, परतीचा पाऊस दररोज जोरदार हजेरी लावत असल्यामुळे शेतात जे काही पिकले आहे, त्या पिकांचेही नुकसान होऊ लागले आहे. तर बरीचशी भात पिके पाण्याखाली येऊन शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परतीच्या पावसापासून शेती वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. चिरनेर परिसरात काही भागातील भात शेतीवर रोगाची छाया पसरल्याने दाणे न भरताच भात पोचट राहिले आहे. त्यात पिकलेल्या शेतीची रानडुकरे नासाडी करु लागल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.

उरण तालुक्यात रानडुकरांपासून भात पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री पहारा देण्याची वेळ ओढवली आहे. तर भात पिकांचे संरक्षण करण्यासाठी केलेल्या प्रतिकारात रानडुक्कर मेल्यास शेतकऱ्याविरुध्द शिकारीचा गुन्हा दाखल होत असल्याने कोणीही असा प्रतिकार अथवा बंदोबस्त करण्याच्या मनस्थिती दिसून येत नाही. एकंदरीतच शेतकऱ्यांच्या शेताची नासधूस होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.
-हरिश्चंद्र गोंधळी, कल्पेश म्हात्रे (शेतकरी). 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण उपचाराच्या प्रतिक्षेत