वर्षोनुवर्षे एकाच विभागात कार्यरत ५४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
उल्हासनगर : सामान्य प्रशासनाच्या अहवालानुसार महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून उल्हासनगर महापालिकेच्या विविध विभागात कार्यरत ५४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. तर काहींची पदोन्नती करण्यात आल्याने त्यांची दिवाळी गोड झाली आहे.
महापालिकेच्या आस्थापनेवरील काही कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत होते. एकाच पदावर अनेक वर्षे काम करीत असल्याने त्यांच्या मनमानी कारभाराबाबत सतत वाढत्या तक्रारी लक्षात ठेवून महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी १५ आवटोबर रोजी ५४ कर्मचाऱ्यांची दुसऱ्या विभागात उचलबांगडी केल्याने प्रथमच महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामध्ये कनिष्ठ लेखा परीक्षक, वरिष्ठ लिपिक, कर निरीक्षक, कनिष्ठ लिपिक, जकात निरीक्षक, शिपाई, सुरक्षा रक्षक, सफाई कामगार, मजूर यांचा समावेश आहे. आयुक्त विकास ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ.विजय खेडकर आणि सहायक आयुक्त सुनिल लोंढे यांनी कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावली आहे.
बंपर पदोन्नतीने प्रशासकीय, तांत्रिक सेवेतील कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड...
एकीकडे एकाच विभागात वर्षोनुवर्षे कार्यरत कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली असताना दुसरीकडे आयुक्त विकास ढाकणे यांच्या धडाकेबाज निर्णयामुळे महापालिकेत प्रथमच प्रशासकीय सेवेत सहाय्यक आयुक्त या पदावर ३ जणांची वर्णी लागली आहे.
अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त डॉ. विजय खेडकर आणि सहाय्यक आयुक्त सुनील लोंढे यांनी सामान्य प्रशासन विभागाची अनेक वर्षांपासून रखडलेली पदोन्नतीची प्रक्रिया गतिमान केलेली असून पहिल्या टप्प्यात ३ सहाय्यक आयुक्त, २ अधीक्षक, १२ वरिष्ठ लिपीक, ६ वीजतंत्री आणि १७ तारतंत्री या पदांवर कर्मचाऱ्यांची पदोन्नती करुन त्यांची येणारी दिवाळी गोड केली आहे.