‘पनवेल आयटीआय'ला डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव
पनवेल : महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य जगाला प्रेरणा देणारे आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी ‘पनवेल आयटीआय'च्या नामांतरण सोहळ्यावेळी काढले. तसेच या ठिकाणी सुरु होणाऱ्या कौशल्य विकास केंद्रालाही तीर्थरुप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचेच नाव देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
पनवेल मधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला महाराष्ट्र भूषण श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय सकरारने घेतला. त्यानुसार सदर नामांतरण सोहळा आ. प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी ‘भाजपा'चे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, अमरीश मोकल, कर्णा शेलार, मनिषा बहिरा, संस्थेचे प्राचार्य नितीन चौधरी, उपप्राचार्य विजय कुमार टीकोळे, वैभव वैशंपायन यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ. प्रशांत ठाकूर यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव दिल्याबद्दल सरकारचे आभार मानले. ‘पनवेल आयटीआय'ला जिल्ह्यात प्रचंड मोठी मागणी आहे. त्यामुळे तीर्थरुप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाची जोड मिळणार असल्याने ‘आयटीआय'च्या रुपांतराचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरु होणार आहे. औद्योगिक शिक्षण क्षेत्रात सदरचे नामांतरण महत्त्वपूर्ण पाऊल असून, या संस्थेच्या माध्यमातून नव्या पिढीला उत्कृष्ट औद्योगिक कौशल्य मिळेल, असा विश्वास ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला.