केगांव ग्रामपंचायतीची पाणी टंचाई लवकरच दूर

उरण : ‘महाविकास आघाडी'ची सत्ता असलेल्या उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायतीने मागील अनेक वर्षांपासून ‘एमआयडीसी'ची पाणी बिलाची थकबाकी असलेली ३३ लाख ३७ हजार ५०६ रुपयांची रक्कम अदा केली आहे. त्यामुळे आता हद्दीतील १० गावातील १० हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीला ६ इंच व्यासाची पाईप लाईन टाकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे ‘एमआयडीसी'कडून पुरेशा प्रमाणात आणि अधिक दाबाने पाणी पुरवठा करण्यास पर्यायाने पाणी टंचाई दूर करण्यास मदत होणार आहे.

केगाव ग्रामपंचायत हद्दीतील गावांना ‘एमआयडीसी'कडून अनेक वर्षांपासून दिड इंच व्यासाच्या पाईप लाईनमधून पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र, १० हजार लोकसंख्येच्या तुलनेत दिड इंच व्यासाच्या पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा नागरिकांना कमी दाबाने आणि पुरेशा प्रमाणात होत नाही. यामुळे हद्दीतील नागरिकांना ८-१० दिवसातून फक्त एकदाच एक तास पाणी पुरवठा करण्याची नामुष्की ग्रामपंचायतीवर येऊन ठेपली आहे. यामुळे ग्रामस्थांना मागील अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचाही सामना करावा लागत आहे.

नागरिकांची पाणी टंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून दिड इंचाच्या पाणी जोडणी ऐवजी ६ इंच व्यासाची नवीन पाणी कनेक्शन देण्याची मागणी ग्रामपंचायतीकडून सातत्याने केली जात आहे. मात्र, केगाव ग्रामपंचायतीने मागील अनेक वर्षांपासून पाणी बिलाची ३३ लाख ३७ हजार ५०६ रुपयांची रक्कम ‘एमआयडीसी'ला अदा केली नसल्याने ६ इंच व्यासाची नळ जोडणी देण्यास ‘एमआयडीसी'कडून अडथळा निर्माण झाला होता. आधी पाणी बिलाची थकबाकी अदा करा; त्यानंतरच ६ इंच व्यासाची नवीन जोडणी देण्यात येईल, अशी तंबीच ‘एमआयडीसी'कडून देण्यात आली होती. केगाव ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

आता मात्र ‘महाविकास आघाडी'ची सत्ता असलेल्या येथील केगाव ग्रामपंचायतीने मागील अनेक वर्षांपासून ‘एमआयडीसी'ची पाणी बिलाची थकबाकी असलेली ३३ लाख ३७ हजार ५०६ रुपये रक्कम धनादेशाद्वारे १५ ऑवटोबर रोजी अदा केली. याप्रसंगी ग्रामपंचायतच्या सरपंच वीणा नाईक, उपसरपंच योगीता ठाकूर, सदस्य श्रृतीका पाटील, ज्योती पाटील, रजनी पाटील, भावना पाटील, पुजा पाटील, चिंतामण पाटील, अमोल तांबोळी, जगजीवन नाईक, आशिष तांबोळी, नंदकुमार पाटील, अविनाश पाटील आणि ग्रामविकास अधिकारी रामकृष्ण म्हात्रे उपस्थित होते.

पाणी टंचाई दूर करण्यासाठी ६ इंच व्यासाची नवीन पाणी जोडणी देण्याची मागणी ग्रामपंचायतीकडून यावेळी करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या मागणीनंतर पाणी बिलाची थकबाकी संपूर्ण भरली आहे. त्यामुळे ६ इंच व्यासाची नवीन पाणी जोडणी देण्याची कार्यवाही लवकरच सुरु करण्याचे आश्वासन ‘एमआयडीसी'चे उरण विभागीय उपअभियंता जी. एम. सोनवणे यांनी दिले आहे.

केगांव ग्रामपंचायत हद्दीतील १० गावातील १० हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीला ६ इंच व्यासाची पाईप लाईन टाकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे पुरेसा प्रमाणात आणि अधिक दाबाने पाणी पुरवठा करण्यास आणि पाणी टंचाई दूर करण्यास मदत होणार आहे.
-वीणा नाईक, सरपंच-केगांव ग्रामपंचायत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘पनवेल आयटीआय'ला डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव