ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे लवकरच भगवान गौतम बुध्द यांच्या पुतळ्याची उभारणी
नवी मुंबई: नवी मुंबई शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या ज्वेल ऑफ नवी मुंबई या स्थळाला अधिक आकर्षक करण्याच्या दृष्टीने भगवान गौतम बुध्द यांचा भव्य पुतळा उभारण्याची संकल्पना आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी २०१९ मध्ये मांडली होती. त्यावेळी आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी तत्कालीन महापौर जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्यासह या स्थळाची पाहणी केली होती. अखेरीस आमदार सौ. म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नांतून नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे विश्वशांतीचे प्रतिक भगवान गौतम बुध्द यांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. या कामाचे भूमीपुजन १५ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई आरपीआय अध्यक्ष महेश खरे यांच्या शुभहस्ते पार पडले.
याप्रसंगी आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत एल. आर. गायकवाड, अंबुरे, हनुवते, श्रीमती वाघमारे, संदीप जाधव तसेच आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध प्रकल्पांमुळे नवी मुंबईला जागतिक शहराचा दर्जा प्राप्त व्हावा याकरिता अन्य प्रांतातील विविध धर्मियांचा नवी मंुबई शहराकडे ओढा वाढू लागला आहे. पामबीच मार्गावर नेरुळ येथे महापालिकेच्या माध्यमातून ज्वेल ऑफ नवी मुंबई असे आकर्षक उद्यान विकसित करण्यात आले आहे. सदर उद्यान पर्यटकांसाठी आकर्षणाचा भाग ठरले आहे. नवी मुंबईच नव्हे, तर आजुबाजुच्या शहरातील नागरिकांची सुध्दा येथे गर्दी पहावयास मिळते. त्याअनुषंगाने आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून अंदाजित ७४ लाख रुपये खर्चातून सदर ठिकाणी भगवान गौतम बुध्द यांचा आकर्षक पुतळा उभारण्यात येणार आहे.
तसेच आमदार मंदाताई म्हात्रे पुढे म्हणाल्या की, गौतम बुध्द यांना शांततेचे प्रतिक म्हणून जगात ओळखले जाते. नवी मुंबईसह रायगड येथे त्यांचा कोठेही पुतळा नाही. ज्वेल ऑफ नवी मुंबई सारख्या प्रेक्षणीय स्थळी भगवान गौतम बुध्द यांचा आकर्षक पुतळा उभारला जाणार असल्याने या ठिकाणचे महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्याही वाढणार आहे, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.