‘नमुंमपा'च्या ‘शिक्षण व्हिजन'वर गुणवत्तेची मोहोर

नवी मुंबई :  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना देणारे ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' असे विविध स्पर्धात्मक उपक्रमांवर आधारित अनोखे अभियान मागील वर्षी यशस्वी झाल्यानंतर यावर्षी दुसरा टप्पा ५ ते १५ सप्टेंबर या कालावधीत राज्यभरात उत्साहाने राबविण्यात आला. त्यामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय नमुंमपा शाळा क्र.५५, आंबेडकर नगर, राबाडे या शाळेने अभियानात सहभागी ९८ हजारहून अधिक शाळांतून राज्यात द्वितीय क्रमांक संपादन केला आहे.

एनसीपीए, मुंबई येथे झालेल्या समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते, शालेय शिक्षण-मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, शिक्षण विभागाचे आयुक्त सुरज मांढरे तसेच इतर मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत ‘नमुंमपा'च्या वतीने शिक्षण विभागाच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे, शिक्षणाधिकारी अरुणा यादव, शिक्षण विस्तार अधिकारी सुलभा बारघरे, शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना वनशा आणि इतर शिक्षकांनी सदर मानाचा पुरस्कार स्विकारला.

या पुरस्काराच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण व्हिजनवर गुणवत्तेची मोहोर उमटलेली असून महापालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. याचे श्रेय नमुंमपा शिक्षण विभाग, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांना असल्याचे सांगत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी संबंधित सर्व घटकांचे आणि नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे.  

यावर्षी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ९८ हजारहून अधिक शाळांतील १.९१ कोटीहून अधिक विद्यार्थी आणि ६.६० लाखाहून अधिक शिक्षकांनी सहभागी होत यशस्वी केले. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या शाळांतील शिक्षक, पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांच्यामध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी याकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' अभियान सुरु करण्यात आले. अभियानाचा यावर्षी दुसरा टप्पा घेण्यात आला.

शासन निर्णयानुसार दिलेल्या निकषानुसार शाळांचे मुल्यांकन करताना शाळेतील पायाभूत सुविधा, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी आणि शैक्षणिक संपादणूक या प्रमुख घटकांवर आधारित एकूण १५० गुणांच्या विविध स्पर्धात्मक उपक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार शाळांचे शाळास्तर, तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागीय स्तर, राज्यस्तर अशा ५ स्तरावर मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये आंबेडकर नगर, राबाडे येथील शाळेने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून ३१ लाख रुपयांचे बक्षीस पटकाविले आहे.

माजी महापौर सुधाकर सोनवणे यांचे या शाळेच्या प्रगतीकडे सुरुवातीपासून बारकाईने लक्ष राहिले असून येथील प्रत्येक काम आणि उपक्रम नाविन्यपूर्ण व उल्लेखनीय व्हावा, असा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. त्यासाठी ते पुढाकार घेत असतात. या अभियानातील सर्व उपक्रमांत शाळेशी संबंधित १०० % घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यामुळे मिळालेले यश येथे शिकविणाऱ्या शिक्षकांप्रमाणेच, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठीही अभिमानाची बाब आहे.

सर्व बाजुने उजवेपण जपणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानामध्ये राज्यात द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले असून सदरचे यश सांघिक प्रयत्नांमुळे प्राप्त झालेले आहे. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

महापालिका शिष्यवृत्ती अर्ज करण्यास मुदत वाढ