पोलिसांकडून लोकांना उत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न - पोलीस आयुक्त

उलवे: नवी मुंबई पोलिसांकडून लोकांना उत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याच पध्दतीने उलवे पोलीस स्टेशन मधून ज्येष्ठ नागरिकांसह इतर नागरिकांना चांगल्या सेवा देण्याचा अथक प्रयत्न पोलिसांकडून केला जाईल. त्याचप्रमाणे पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या सर्व सेवा पारदर्शक आणि जलदगतीने देण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास ‘नवी मुंबई'चे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी उलवे येथे व्यक्त केला.  

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते उलवे पोलीस स्टेशनचे उद्‌घाटन झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ‘उरण'चे आमदार महेश बालदी, सह-पोलीस आयुक्त संजयसिंह येनपुरे, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, परिमंडळ-२चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, मुख्यालय उपायुक्त संजयकुमार पाटील, गुन्हे शाखा उपायुक्त अमित काळे, वाहतूक शाखा उपायुक्त तिरुपती काकडे यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.  

यावेळी पोलीस आयुक्त पुढे बोलताना म्हणाले, उलवे नोडची लोकसंख्या २ लाखांच्यावर गेली असून ‘सिडको'चा मोठा गृहप्रकल्प या भागात आहे. त्यामुळे या सगळ्यांची निकड लक्षात घेता, या भागाची सुरक्षितता लक्षात घेऊन लोकांना सुलभ आणिसोयीस्कर होईल अशा पध्दतीने उलवे पोलीस स्टेशन सह इतर पोलीस ठाण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता. मात्र, आमदार महेश बालदी यांनी शासनाकडून उलवेकरांना चांगली सुविधा मिळावी या दृष्टीकोनातून उलवे पोलीस स्टेशनचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करुन घेतल्याचे आयुक्त भारंबे यांनी सांगितले.  

उलवे येथे पोलीस स्टेशन सुरु झाल्यामुळे त्याचा जास्तीत जास्त महिलांना फायदा होणार असल्याचे तसेच पोलीस स्टेशनमुळे परिसरामध्ये पोलिसांचा वावर वाढल्यानंतर आपोआप या भागातील गैरप्रकारांना आळा घालण्यास मदत होईल, असे देखील पोलीस आयुक्तांनी सांगितले. तसेच उलवे पोलीस स्टेशनची इमारत उभारण्यास मोठा कालावधी लागणार असल्यामुळे पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या पोलिसांची आणि पोलीस ठाण्यात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सिडको किंवा इतर खाजगी इमारतीत पोलीस स्टेशन तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित करण्याची सूचना यावेळी पोलीस आयुक्तांनी केली.  

यावेळी आमदार महेश बालदी यांनी आपल्या भाषणात उलवे नोडमध्ये हपते घेणाऱ्यांची दहशत वाढल्यामुळे येथील आठवडी बाजार बंद करण्याची तसेच उलवे नोडमधील भितीचे वातावरण घालवण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना पोलिसांनी केली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे लवकरच भगवान गौतम बुध्द यांच्या पुतळ्याची उभारणी