जेवणाच्या डब्यातून तळोजा कारागृहात अमली पदार्थ लपवून घेऊन जाणारा पोलीस शिपाई अटकेत
नवी मुंबई : जेवणाच्या डब्यातून तळोजा कारागृहात चरस, एमडीएमए व गांजा यासारखे अमली पदार्थ लपवून घेऊन जाणाऱया एका पोलीस शिपाईला कारागृहातील पोलिसांनी तपासणीदरम्यान पकडल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. अनिल आसराम जाधव (38) असे या पोलीस शिपाईचे नाव असून त्याच्या ताब्यातून तब्बल 10 लाख 8 हजार रुपये किंमतीचे चरस, एमडीएमए व गांजा जप्त करण्यात आले आहे. पोलीस शिपाई जाधव हा सदरचे अमली पदार्थ कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांना सेवन करण्यास देण्यासाठी घेऊन जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार खारघर पोलिसांनी त्याला एनडीपीएस कलमाखाली अटक केली आहे. सदरचे अमली पदार्थ त्याने कुणाकडुन व कोणत्या कैद्याला देण्यासाठी आणले होते, याचा पोलिसांकडुन पुढील तपास करण्यात येत आहे.
या कारवाईत अटक करण्यात आलेला पोलीस शिपाई अनिल जाधव हा तळोजा मध्यवर्ती कारागृहात कार्यरत होता. तसेच तो बांद्रा येथील खेरवाडी पोलीस वसाहतीत राहण्यास होता. बुधवारी रात्रपाळीच्या डयुटीसाठी 12 पोलीस कर्मचारी सायंकाळी 5.30 वाजता तळोजा कारागृहात हजर झाले होते. यावेळी नियमांप्रमाणे कारागृहात डयुटीवर हजर होण्यासाठी गेलेल्या सर्व पोलिसांची कारागृहातील ओळख परेड रुममध्ये तपासणी करण्यात येत होती. पोलीस हवालदार जयवंत जाधव हे वरिष्ठ अधिकाऱयांसमक्ष सर्व पोलिसांची तपासणी करत होते. यावेळी अनिल जाधव याची तपासणी केल्यानंतर त्याने सोबत आणलेल्या जेवणाच्या डब्याच्या पिशवीची तपासणी सुरु केली.
यावेळी पोलीस शिपाई अनिल जाधव याने सदर पिशवी लपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस हवालदार जयवंत जाधव यांना त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी संपुर्ण पिशवीची व्यवस्थीत तपासणी केली असता, अनिल जाधव याने जेवणाच्या डब्याखाली एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये अमली पदार्थ लपवून आणल्याचे आढळून आले. त्यानंतर कारागृह पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेऊन त्याने आणलेले अमली पदार्थ जप्त केले. तसेच खारघर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर खारघर पोलिसांनी तळोजा कारागृहात धाव घेऊन त्याला अटक केली.
तळोजा कारागृहातील पोलीस शिपाई अनिल जाधव याच्या ताब्यातून 123.87 ग्रॅम वजनाचे 8 लाख 68 हजार रुपये किंमतीचे चरस, तसेच 2.29 ग्रॅम वजनाचे 1 लाख रुपये किंमतीचे एमडीएमए तसेच 40.57 ग्रम वजनाचा 40 हजार रुपये किंमतीचा गांजा त्याचप्रमाणे गांजा ओढण्यासाठी लागणारे पेपरच्या (गोगो) पाच पट्टया असा एकुण 10 लाख 8 हजार रुपये किंमतीचा अमली पदार्थ जफ्त करण्यात आला आहे. त्याने सदरचे अमली पदार्थ कुणाकडुन आणले, तसेच कारागृहात कोणत्या कैद्याला सदरचे अमली पदार्थ देण्यासाठी घेऊन जात होता, याचा पोलिसांकडुन अधिक तपास करण्यात येत आहे.