अंमली पदार्थाची विक्री करणारा नायजेरीयन नागरीक अटकेत  

घर मालक आणि इस्टेट एजंटवर सुद्धा गुन्हा दाखल  

नवी मुंबई : तळोजा परिसरात बेकायदेशीररीत्या राहुन अंमली पदार्थाची विक्री करणा-या एका नायजेरीयन नागरीकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने  मंगळवारी सायंकाळी छापा मारुन अटक केली आहे. तसेच त्याच्या ताब्यातून मेफड्रॉन पावडर व कोकेन असा एकुण 25 लाख 43 हजार रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहे. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या नायजेरीयन नागरीकाला बेकायदेशीरपणे राहण्यास देणा-या घरमालकावर व इस्टेट एजंटवर सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

तळोजा एकटपाडा येथील आय.जी रेसिडेन्सी इमारतीत राहणारा नायजेरीयन नागरीक आपल्या घरामधून अमली पदार्थाची गिऱहाईकांना विक्री करत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत नायडु, निलेश धुमाळ, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर बनकर, विजय पाटील, रमेश तायडे, गणेश पवार, पोलीस नाईक संजय फुलकर, अकुंश म्हात्रे आदींच्या पथकाने तळोजा एकटपाडा येथील आय. जी रेसिडेन्सी इमारतीवर मंगळवारी सायंकाळी छापा मारला.  

यावेळी सदर घरामध्ये इफियानी क्रिस्टीयान इयादा (43) हा नायजेरियन नागरिक राहत असल्याचे आढळुन आले. यावेळी त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ 4 लाख 30 हजार रुपये किंमतीची 21.16 ग्रॅम वजनाची मेफड्रॉन पावडर तसेच 21 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 106.74 ग्रॅम वजनाचे कोकेन असा एकुण 25 लाख 43 हजार रुपये किंमतीचा अंमली पदार्थाचा साठा आढळुन आला. त्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाने सदर नायजेरीयन नागरीकाविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्टसह परदेशी नागरीक कायदा व रजिस्ट्रेशन ऑफ फॉरेनर्स ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

घर मालक आणि इस्टेट एजंटवर सुद्धा गुन्हा दाखल  

या कारवाईत अटक करण्यात आलेला नायजेरीयन नागरीकाच्या व्हिजाची मुदत वर्षभरापुर्वी (3 ऑक्टोबर 2023) संपलेली असताना देखील तो नवी मुंबईत बेकायदेशीररीत्या राहुन अंमली पदार्थाची विक्री करत असल्याचे तपासात आढळुन आले आहे. तसेच तो तळोजा येथील आय.जी रेसिडेन्सी मधील ज्या घरात रहात होता, त्या घर मालकाने व इस्टेट एजंटने नायजेरीयन नागरीक इफियानी इयादा याच्या कागदपत्रांची पडताळणी न करता, तसेच त्याचे सी फॉर्म न भरता, त्याला घर भाडयाने दिल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे अंमली पदार्थ विरोधी पथकाने या प्रकरणात घर मालक जगदिश सिंग व इस्टेट एजंट गोकुळ गायकवाड या दोघांविरोधात देखील गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पोलीस, महापालिका प्रभाग कार्यालयाची जबाबदारी महिला अधिकाऱ्याकडे