मुंबईकरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न ‘म्हाडा'च्या माध्यमातून साकार - गृहनिर्माण मंत्री सावे
मुंबई : ‘स्वप्न पूर्ण करणारे शहर' म्हणून ओळख असलेल्या मुंबईत आपल्या हक्काचे घर असावे, असे सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न असते. मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासन ‘म्हाडा'च्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करीत असते. मुंबईकरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न ‘म्हाडा'च्या माध्यमातून साकार होत असल्याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केले.
‘म्हाडा'च्या ‘मुंबई गृहनिर्माण-क्षेत्रविकास मंडळ'तर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत उभारण्यात आलेल्या २,०३० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत ८ ऑवटोबर रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे काढण्यात आली.
याप्रसंगी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, ‘गृहनिर्माण विभाग'च्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह, ‘म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, ‘मुंबई मंडळ'चे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, ‘मुंबई इमारत दुरुस्ती-पुनर्रचना मंडळ'चे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, आदि उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रत्येकाला घर देण्याचे स्वप्न आहे. सर्वासाठी घरे असे स्वप्न साकार होण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना, मोदी घरकुल आवास योजना सुरु केल्या आहेत. या माध्यमातून अल्प, मध्यम उत्पन्न गटातील सर्वसामान्यांना घरे वाटप करण्यात येत आहेत. राज्यात ७.५० लाख घरे बांधण्यात आली असून यातली २.५० लाख घरे मुंबईमध्ये बांधली गेली आहेत. सदर लॉटरीसाठी २,०३० घरांसाठी १ लाख १३ हजार पेक्षा जास्त अर्ज आले होते. सदर सोडत मानवी हस्तक्षेपविरहित संपूर्णतः ऑनलाईन अशा संगणकीय प्रणालीद्वारे प्रक्रिया राबविण्यात आली आहे. नाशिक, पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या शहरात पारदर्शकपणे लॉटरी प्रक्रिया मार्फत लोकांना घरे मिळाली आहेत. मुंबई शहर आणि परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे घरांची मागणी देखील वाढत आहे. मुंबईत दुसरी सोडत असून लवकरच आणखी घरांची सोडत होईल. अभ्युदय नगर, कामाठीपुरा, शहरातील जुन्या वस्त्या येथील पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागत आहे. राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच आणले जाणार असून गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या व टिकाऊ घरांवर भर दिला जाणार असल्याचे ना. अतुल सावे यांनी यावेळी सांगितले.
‘म्हाडा'मुळे मुंबईतील सर्वसामान्यांना घराचा दिलासा - ना. केसरकर
‘म्हाडा'च्या या लॉटरीमुळे मुंबईत सर्वसामान्य नागरिकांना घर मिळणार आहे. म्हाडाने मुंबईतील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम केले असल्याचे मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यात येत आहे. धारावी, बीडीडी चाळ यांच्या पुनर्विकासामुळे या भागातील नागरिकांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहेत. सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजना'च्या माध्यमातून विकास करण्यात येत आहे. तसेच मुंबईच्या विकासासाठी लवकरच ‘वलस्टर'ची योजना सुरु करण्यात येणार आहे. या माध्यमातून मुंबईत लक्षावधी घरे उपलब्ध होतील, असेही यावेळी ना. दीपक केसरकर यांनी सांगितले.
आजची लॉटरी प्रणाली पूर्णपणे मानवी हस्तक्षेपविरहित आहे. सदर लॉटरी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकपणे झालेली आहे. म्हाडा म्हणजे विश्वास. ‘म्हाडा'चे घर मिळण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला यावरुनच लोकांचा म्हाडावर किती विश्वास आहे, ते लक्षात येते. एक स्थिर आणि सुरक्षित घर सर्वांचे स्वप्न आहे. या लॉटरी प्रक्रियेने ते स्वप्न पूर्ण होत आहे, असे अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह म्हणाल्या
प्रास्ताविकात संजीव जयस्वाल म्हणाले, २,०३० सदनिकांच्या विक्रीकरिता सोडत करण्यात आली आहे. यासाठी अनामत रवकमेसह १ लाख १३ हजार ८११ अर्ज पात्र होते. गेल्या वर्षभरात मुंबईमध्ये दुसऱ्यांदा लॉटरी प्रक्रिया राबविण्यात आली आहे. लोकांच्या मागणीनुसार सदनिकांचे दरही कमी करण्यात आले आहेत.
सोडतीत सहभाग घेतलेल्या अर्जदारांची संख्या लक्षात घेता ‘मंडळ'तर्फे व्यापक नियोजन करण्यात आले होते. तसेच अर्जदारांना सोयीस्कररीत्या निकाल पाहता यावा याकरिता सभागृहाच्या आवारात आणि सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात आले होते. सदर प्रकल्पात मुंबईतील गोरेगांव, मालाड, जुहू, दादर, वरळी, ताडदेव, वडाळा, कन्नमवारनगर, पवई यासह अन्य काही ठिकाणच्या एकूण २,०३० घरांसाठी ९ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर दरम्यान अर्ज विक्रीची प्रक्रिया राबविण्यात आली होती.
दरम्यान, जयश्री कोटकर आणि कृपाल पटेल या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन पत्र यावेळी देण्यात आले. कार्यक्रमात आभार प्रदर्शन मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी मानले.