आयात शुल्क वाढल्याने खाद्यतेल दरात ३० टक्के वाढ

वाशी : डिसेंबर २०२२ मध्ये रशिया विरुध्द युक्रेन मध्ये सुरु झालेल्या युध्दामुळे भारतात खाद्यतेलाची किंमत वाढली होती. मात्र, एक वर्षानंतर  खाद्यतेल दर स्थिर झाले होते. परंतु, केंद्र सरकारने आता आयात शुल्क २० टक्के वाढवल्याने भारतीय  बाजारात पुन्हा एकदा खाद्यतेलाचा भडका उडाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मलेशिया, इंडोनेशिया या देशातही तेलाची मागणी आहे, त्यामुळे खाद्यतेलाचा देखील तुटवडा जाणवत असल्याने खाद्यतेलाचे दर वधारले आहेत.

ऐन सणासुदीच्या तोंडावर आता  खाद्यतेलाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. सध्या नवरात्रौत्सव सुरु असून दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे दिवाळीमध्येही खाद्यतेलाला मागणी अधिक असते. या कालावधीतही  खाद्यतेल दरात वाढ होण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी  खाद्यतेलाच्या दराने उच्चांक गाठला होता. मात्र, हळूहळू खाद्यतेलाचे दर पूर्वपदावर येऊन गेल्या कित्येक महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर स्थिरावले होते. परंतु, आता पुन्हा खाद्यतेलाच्या दराने उसळी घेतली असून, केंद्र सरकारने २० टक्के आयात शुल्क लादल्याने खाद्यतेलाच्या दरात ३० टक्के वाढ झाली आहे, असे मत वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मधील घाऊक व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.

दोन वर्षांपूर्वी तीन हजार रुपयांपर्यंत गेलेले १५ किलो खाद्यतेलाचे दर अलिकडे पंधराशे ते सोळाशे रुपयांपर्यंत आले होते. परंतु, आता पुन्हा तेलाच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली असून, खाद्यतेल दरात  प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांची वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मलेशिया आणि इंडोनेशिया या देशातही तेलाची मागणी वाढत आहे.  त्यामुळे बाजारपेठेत तेलाचे दर चढेच आहेत. देशाला वर्षाकाठी  १ करोड टन खाद्यतेलाची गरज भासते. त्यापैकी २५ लाख टन सूर्यफूल तेल  तर ६०-७०लाख टन पाम तेल आयात होते. यापैकी  ७५ टक्के सुर्यफुल तेल युक्रेन तर २० टक्के रशिया आणि ५ टक्के अर्जेंटिना येथून आयात होते. पामतेल मलेशिया आणि इंडोनेशिया येथून आयात होते. देशाला लागणारे सूर्यफूल तेल युक्रेन आणि रशिया मधून मोठ्या प्रमाणात आयात होते. एपीएमसी बाजारात महिन्याला ७ ते आठ ८ टन तेलाची आवक होत असते. मात्र, मागणी वाढल्यामुळे तेलाचा पुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे ३० टवक्यांनी खाद्यतेलाचे दर वधारले असून, पुढील कालावधीतही खाद्यतेल दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

----------------------------------
केंद्र सरकारने आयात शुल्क २० टक्क्यांनी लावल्याने मागील काही महिन्यांपासून स्थिर असलेल्या खाद्यतेलाच्या दरात ३० टक्के वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही तेलाची मागणी वाढली असून, इतर बाजारात देखील खाद्यतेलाच्या दरात तेजी आहे. त्यामुळे पुढील कालावधीत आणखी खाद्यतेल दरात वाढ होण्याची शक्यता आहे. - हरीश भानुशाली, घाऊक तेल व्यापारी- मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी), वाशी.


खाद्यतेल           आधीचे दर           आताचे दर(प्रतिकिलो)
सूर्यफूल तेल      १००-१०२ रुपये       १३५  रुपये              
पाम तेल           १००-१०२ रुपये       १२५ रुपये
मोहरी तेल        १३०-१३५ रुपये       १७०-१८० रुपये 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मुंबईकरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न ‘म्हाडा'च्या माध्यमातून साकार - गृहनिर्माण मंत्री सावे