दरोडा, चैन स्नॅचिंग, मोटारसायकल चोरी सारखे गंभीर गुन्हे करुन धुमाकूळ घालणारी आंतरराज्य टोळी अटकेत
नवी मुंबई : दिल्लीमध्ये दरोडा, चैन स्नॅचिंग या सारखे गंभीर गुन्हे करुन फरार असलेले व नवी मुंबईत चैन स्नॅचींग व मोटारसायकल चोरीचे गुन्हे करुन धुमाकूळ घालणाऱ्या आंतरराज्य टोळीला गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने अटक केली आहे. गुन्हे शाखेने या टोळीकडुन एकुण 66 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, तसेच गुन्हे करण्यासाठी चोरलेल्या 2 केटीएम मोटारसायकल असा एकूण 7 लाख 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केले आहे.
या कारवाईत अटक करण्यात आलेल्या टोळीने गत सफ्टेंबर महिन्यामध्ये एका आठवडयामध्ये सीबीडी, खारघर, पनवेल शहर, कळंबोली, नेरुळ, वाशी, सानपाडा व कामोठे परिसरात चैन स्नॅचींगचे गुन्हे करुन धुमाकुळ घातला होता. त्यामुळे गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणातील टोळीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेटी देवून समांतर तपास सुरु केला. तसेच एक आठवडा तांत्रिक तपास करुन उलवे परिसरातून या टोळीतील आरोपींचे छायाचित्र प्राप्त केले.
त्यानंतर गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार, सतिश भोसले, महेश जाधव, निलम पवार, पोलीस उपनिरीक्षक राहूल भदाणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगेश वाट, पोलीस हवालदार शशिकांत शेंडगे, उर्मिला बोराडे, अनिल यादव संजय राणे, महेश पाटील आदींनी उलवे परिसरातील 40 ते 45 सोसायटया व गेस्ट हाऊसची तपासणी करुन जुगेश मेहरा (27), अभय सुनिलकुमार (19) व शिखा सागर मेहरा (27) या तिघांना 2 ऑक्टोबर रोजी अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा साथीदार अनुज विरसींग छारी (24) याचा 6 ऑक्टोबर रोजी न्यायालयातुन पनवेल मधील जबरी चोरीच्या गुन्हयातून ताबा घेतला.
त्यानंतर गुन्हे शाखेने या आरोपीकडे अधिक चौकशी केला असता त्यांनी नवी मुंबई परिसरात 7 जबरी चोरी, 2 वाहन चोरी तसेच व दिल्ली येथील 1 गुन्हा असे एकुण 10 गुन्हे केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी या टोळीला अटक करुन त्यांच्याकडुन 1 सोन्याचे मंगळसुत्र, 3 सोन्याच्या चैन, 2 तुटलेल्या सोन्याच्या चैनचे तुकडे असे एकुण 66 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, तसेच 2 केटीएम मोटार सायकल असा एकूण 7 लाख 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अमित काळे (पोलीस उपआयुक्त-गुन्हे शाखा)
या कारवाईत अटक करण्यात आलेली आंतरराज्यीय सराईत टोळी दिल्ली येथून वेगवेगळ्या गुह्यात फरार आहे. यातील सागर जुगेश मेहरा या आरोपी विरुध्द दिल्ली येथे 37 वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल असून एका गुन्हयात तो फरार आहे. सदर आरोपी दिल्ली येथील न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहत नसल्याने न्यायालयाने त्याच्या विरोधात 4 जाहिरनामे सुद्धा प्रसिध्द केले आहेत. तसेच अनुज विरसींग छारी याच्या विरोधात देखील कोपरखैरणे व पनवेल शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.