वीज दरवाढी विरोधात ‘सपा'चे महावितरण कार्यालयावर आंदोलन
नवी मुंबई : ‘महावितरण'ने वीजेची मोठी दरवाढ करुन सर्वसामान्य नागरिकांना एकप्रकारे शॉक दिला आहे. ‘महावितरण'कडून सुरु असलेल्या वीज दरवाढीच्या निषेधार्थ ४ ऑक्टोबर रोजी ‘समाजवादी पार्टी नवी मुंबई'च्या वतीने ‘महावितरण'च्या वाशी येथील कार्यालयावर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘समाजवादी पार्टी'च्या शिष्टमंडळाने ‘महावितरण'च्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन वाढलेल्या वीज दरात कपात करुन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली. यावेळी ‘महावितरण'च्या अधिकाऱ्यांनी देखील आंदोलनकर्त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत ‘समाजवादी पार्टी'च्या मागण्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
‘महावितरण'ने वीजेची मोठी दरवाढ करुन सर्वसामान्य ग्राहकांना एक प्रकारे शॉक दिला आहे. प्रत्येकाला हवी असणारी वीज युनिटची किंमत आवाक्याबाहेर पोहोचली आहे. या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे. झालेली वीज दरवाढ परवडत नसल्याने सामान्य ग्राहक हतबल झाला आहे. ‘महावितरण'कडून सुरु असलेल्या या वीज दरवाढीच्या निषेधार्थ ४ ऑक्टोबर रोजी ‘समाजवादी पार्टी'चे नवी मुंबई शहर अध्यक्ष आर. एन. यादव यांच्या नेतृत्वाखाली ‘महावितरण'च्या वाशी येथील कार्यालयावर निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी आर. एन. यादव यांच्यासह लालचंद यादव, सर्वजीत यादव, मनोज यादव, बिंद कुमार, शिव प्रसाद, संजय यादव, सुरेश यादव, पप्पु कनौजिया, इमरान शाह, दीपक यादव, राम अवध यादव, सज्जाद खान आदिंच्या शिष्टमंडळाने ‘महावितरण'च्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन वाढलेल्या वीज दरात कपात करुन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली. तसेच ‘महावितरण'ने जनतेला कमीत कमी ३०० युनिट वीज मोफत द्यावी. तसेच विलंब शुक्ल घेणे बंद करण्याची मागणी केली. तर याबाबत ‘महावितरण'ने तातडीने कार्यवाही करण्याबाबत अधिकाऱ्यांना सुचित केले. सदर आंदोलनात शेकडो नागरिक सहभागी झाले होते.