तीर्थदर्शन योजनेंतर्गत नवी मुंबईतून १२१ ज्येष्ठ नागरिक अयोध्याकडे रवाना
नवी मुंबई : ज्या नागरिकांना पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे अथवा कोणी सोबत नसल्याने तसेच पुरेशी माहिती नसल्याने जाणे शक्य होत नाही, अशा ६0 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' राबविण्यात येत आहे. या योजना अंतर्गत निवड झालेल्या ठाणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा समुह ४ ऑवटोबर रोजी श्रीराम मंदिर अयोध्या याठिकाणी रवाना झाला असून त्यामध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रातून १२१ लाभार्थी ज्येष्ठ नागरिक तीर्थयात्रेकरिता अयोध्याला गेले आहेत.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर झाल्यानंतर त्याचा लाभ ६० वर्षावरील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजविकास विभागामार्फत विविध माध्यमांतून योजनेचा प्रभावी प्रचार करण्यात आला. यादृष्टीने नमुंमपा मुख्यालयात ‘ज्येष्ठ नागरिक संघटना'च्या आणि ‘ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र'च्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करुन योजनेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे आठही विभाग कार्यालयांमध्ये तसेच ज्येष्ठ नागरिक संघटना, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रे याठिकाणी योजनेचे अर्ज विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात आले.
याद्वारे महापालिकाकडे २३१ ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज संकलित झाले. सदर अर्ज सहा.आयुक्त, समाजकल्याण विभाग, ठाणे यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले. तेथील छाननीअंती २१३ अर्ज पात्र ठरले. यामधून श्रीराम मंदिर अयोध्या येथे तीर्थ दर्शनाकरिता जाण्यासाठी १५२ अर्जदारांची निवड झाली. या १५२ पात्र लाभार्थ्यांशी समाजविकास विभागाने संपर्क साधून त्यांची अयोध्या येथे जाण्यासाठी संमती घेतली. अशा १५२ पात्र लाभार्थ्यांपैकी ४ ऑवटोबर रोजी २१ ज्येष्ठ नागरिक लाभार्थी अयोध्या रवाना झाले आहेत.
या लाभार्थ्यांना नवी मुंबईतील ४ ठिकाणावरुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी एकत्र येण्याचे सूचित करण्यात आले होते. यामध्ये दिवाळे गाव ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र सेक्टर-१४ याठिकाणी समाजविकास विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे यांनी झेंडा दाखविल्यानंतर २१ लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांना घेऊन बस मुंबईकडे मार्गस्थ झाली.
अशाच प्रकारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज नमुंमपा शाळा क्र.५५, डॉ बाबासाहेब आंबेडकरनगर, रबाले याठिकाणी परिमंडळ उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड, नेरुळ स्टेशन (पश्चिम) सेक्टर-१० गुडविलजवळ सहा.आयुक्त जयंत जावडेकर, सेवटर-३ ऐरोली बस डेपो याठिकाणी सहा.आयुक्त अंकुश जाधव त्या त्या भागातील यात्रेकरु ज्येष्ठ नागरिक समुहाला प्रवासासाठी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. रबाले येथून २९, नेरुळ येथून २५ आणि ऐरोली येथून २ बसेसमध्ये १९ आणि २७ मिळून ४६ ज्येष्ठ नागरिक अयोध्याला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे एनएमएमटी बसेसमधून गेले.
प्रत्येक बससोबत समाजविकास विभागाने समन्वयकाची नियुक्ती केली होती. या बसेसमधून नवी मुंबईतील १२१ लाभार्थी ज्येष्ठ नागरिक सीएसएमटी येथे गेले आणि तेथून पुढे ठाणे जिल्ह्यातील निवड झालेल्या लाभार्थ्यांसमवेत रेल्वेने अयोध्याकडे तीर्थयात्रेला निघाले. या यात्रेकरुंसमवेत जिल्हा समाज कार्यालयांमार्फत नियुक्त १३ स्वयंसेवक असणार असून सदर लाभार्थ्यांचे वय ६० वर्ष आणि त्यापुढील असल्याने नमुंमपाचे डॉक्टरांसह ३ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथकही त्यांच्यासोबत अयोध्येला रवाना झाले आहे.