अटल सेतूवरुन आणखी एका व्यावसायीकाची आत्महत्या  

नवी मुंबई : अटक सेतूवरुन मुंबईतील माटुंगा भागातील एका 52 वर्षीय व्यावसायीकाने समुद्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. फिलिप हितेश शाह (52) असे मृत व्यवसायीकाचे नाव असून त्यांना नैराश्याने ग्रासले होते. त्यामुळे मागील एक महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. याच नैराश्येतून त्यांनी आत्महत्या  केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अटल सेतूचे उद्घाटन झाल्यापासून गत नऊ महिन्यामध्ये या पुलावर सहा आत्महत्यतेच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी एका महिलेला वाचवण्यात यश आले आहे. अटल सेतूवरील वाढत्या आत्महत्येच्या घटनेमुळे हा पुल देखील आता सुसाईड पॉँईट ठरु लागला आहे.  

या घटनेतील मृत फिलिप शहा हे मुंबईतील माटुंगा भागात राहण्यास होते. बुधवारी सकाळी 9.30 च्या सुमारास ते त्यांच्या कारने अटल सेतुवर आले होते. त्यांनतर त्यांनी आपली कार रस्त्याच्या कडेला उभी करुन पुलावरुन समुद्रात उडी मारली. पुलावरील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाने तत्काळ न्हावा शेवा पोलिसांना पुलावर एक कार थांबल्याची माहिती दिली. त्यांनतर पोलिसांनी देखील तत्काळ कार जवळ धाव घेतली. मात्र त्यापूर्वीच फिलिप शाह यांनी पुलावरुन उडी मारली होती. त्यानंतर न्हावाशेवा पोलिसांनी शोधमोहीम राबवून फिलीप शाह यांना समुद्रातून बाहेर काढुन रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.  

यावेळी पोलिसांनी कारची तपासणी केली असता, त्यात फिलीप शाह यांचे आधार कार्ड सापडले. त्यावरुन पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. फिलीप शाह हे मागील काही दिवसांपासून मानसिकदृष्ट्या  खचले होते. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. एका कार्पामाला जायचे असल्याचे सांगून बुधवारी सकाळी ते आपल्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी अटल सेतूवर जाऊन समुद्रात उडी मारुन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या कारमध्ये कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्याचे देखील पोलिसांनी सांगितले. न्हावाशेवा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.  

गत नऊ महिन्यामध्ये अटल सेतूवर घडलेल्या आत्महत्येच्या घटना  
गत सोमवारी सुशांत पावर्ती (40) या बँकरने तणावामुळे अटल सेतूवरुन समुद्रात उडी मारली होती. दुसऱया दिवशी त्याचा मृतदेह सापडला होता. बुधवारी 2 ऑक्टोबर रोजी फिलीप शाह यांनी आत्महत्या केली. गत जुलै महिन्यामध्ये एका 38 वर्षीय इंजिनियरने देखील अटल सेतुवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. त्या इंजिनियरचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. त्याचप्रमाणे पलावा सीटीतील रहिवासी करुतुरी श्रीनिवास यांनीही कामाच्या तणावातून अटल सेतूवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. त्याचाही मृतदेह अद्याप सापडलेला नाही. गत ऑगस्ट महिन्यामध्ये अटल सेतूवरुन उडी टाकण्याचा प्रयत्नात असलेल्या व ब्रिजच्या रेलिंगला लटकलेल्या 56 वर्षीय महिलेला कॅब चालकाने व न्हावाशेवा वाहतूक पोलिसांनी वाचविल्याची घटना घडली होती. तर सर्वात प्रथम मार्च महिन्यामध्ये दादर भोईवाडा परिसरात राहणाऱ्या किंजल शहा (43) या महिला डॉक्टरने नैराष्येतून अटल सेतूवरुन उडी टाकुन आत्महत्या केली होती.  

अटल सेतू आता ठरु लागला सुसाईड पॉँईट  
नवी मुंबई ते मुंबईला जोडणाऱया अटल सेतूचे उद्घाटन झाल्यापासून गत नऊ महिन्यामध्ये या पुलावर सहा आत्महत्यतेच्या घटना घडल्या आहेत. यापैकी एका महिलेला कॅब चालकाने वाचवले आहे. तर इतर पाच जणांचा पुलावरुन समुद्रात उडी मारल्यामुळे मृत्यू झाला आहे, त्यापैकी दोन जणांचा मृत्यू या आठवडयातच झाला असून बुधवारी सकाळी माटुंग्यातील फिलिप शाह (52) यांची सहावी आत्महत्येची घटना आहे. दिवसेंदिवस या पुलावरील आत्महत्येच्या घटनात वाढ होऊ लागल्याने हा पुल देखील आता सुसाईड पॉँईट ठरू लागला आहे.  

अटल सेतू पुलाच्या कठडयाची उंची वाढविण्याची मागणी  
शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) वरील आत्महत्यांची संख्या झपाटयाने वाढत आहे. यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. 21 किमी लांबीचा हा पूल समुद्रापासून खूप उंचीवर बांधण्यात आला आहे. तणावग्रस्त लोक त्यांच्या वाहनाने पुलावर जातात, नंतर ते त्यांची वाहने पुलावर उभी करतात. त्यानंतर पुलाच्या कठडयावरुन ते समुद्रात उडी मारुन आत्महत्या करत असल्याचे आढळून आले आहे. या पुलावरील कठडयाची उंची खूपच कमी आहे. त्यामुळे त्याच्यावर चढणे सोपे असल्यामुळे पुलावरील कठडयाची उंची वाढवण्याची मागणी पोलिसांकडुन करण्यात येत आहे. त्यानुसार या पुलावर वेविंग बॅरेकेट्स लावण्याच्या हालचाली एमएमआरडीएकडुन सुरु आहेत.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

दरोडा, चैन स्नॅचिंग, मोटारसायकल चोरी सारखे गंभीर गुन्हे करुन धुमाकूळ घालणारी आंतरराज्य टोळी अटकेत