कचऱ्याचे योग्य वर्गीकरण होणे गरजेचे
ठाणे : कचरा पुनर्वापरासाठी थ्री-आर म्हणजे 'Reduce (कमी करणे), Reuse (पुर्नवापर), Recycle (पुनर्निमिती'), या तीन पध्दतीप्रमाणे कचऱ्याचे जर योग्य वर्गीकरण केले गेले, तर ९० टक्के कचरा डंपिंग ग्राऊंंडवर जाण्यापासून वाचवता येईल, असे मत कचरा व्यवस्थापन या विषयावर आयोजित कार्यशाळेत तज्ञांनी व्यवत केले.
‘स्वच्छताही सेवा' या स्वच्छता पंधरवडा निमित्त ठाण्यातील पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसोबत, ॲक्शन फॉर ठाणे या संस्थेमार्फत ठाणे महापालिकेने एक दिवसीय कचरा व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन नुकतेच काशिनाथ घाणेकर सभागृहात केले होते.
ठाणे मधील कचरा व्यवस्थापनातील आव्हानांवर लक्ष केंद्रित करुन उपाय काढण्यासाठी दिल्ली, इंदौर, पुणे, आदि विविध शहरांतील तज्ञांनी या सत्रात भाग घेतला. औद्योगिक तज्ञ, तळागाळातील कामगार-संस्था, एनजीओ आणि महापालिकेचे अधिकारी या चर्चासत्रात सहभागी झाले होते. कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन आणि त्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने उपाय शोधून डंपिंग ग्राऊंडवर टाकला जाणारा कचरा कमी करण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली.
कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास कोणतीही तंत्रज्ञान समस्या सोडवू शकत नाही. शहरापासून फार लांब नसलेल्या; परंतु शाश्वत जागा आवश्यक आहेत. ओल्या कचऱ्यासाठी बायोमिथेनेशन, संकुचित बायोगॅस, वेस्ट टू एनर्जी आणि टॉरेफॅक्शन यासारख्या विविध पध्दतींबाबत चर्चा झाली. ठाणेसाठी आणि इतर शहरांसाठी त्यांची व्यवहार्यता आणि महत्त्व तज्ञांनी यावेळी विषद केले.
काही उपायांमध्ये कचरा समस्या सोडवण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि समस्येसाठी दंड लावणे, भाड्याने आधारभूत सुविधा पुरवणे, प्रामाणिक विक्रेत्यांना मान्यता देणे, सोसायटीच्या समिती सदस्यांसाठी जागरुकता सत्रे आयोजित करणे आणि हाऊसकिपिंग एजन्सींसाठी प्रशिक्षण देणे याबाबत चर्चा करण्यात आली. कचरा पुनर्वापरास प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्लास्टिक संकलन, प्लास्टिक कॅफे आदिंना प्रोत्साहन देण्यासाठी एक सामान्य प्लॅटफॉर्म तयार करण्याचे सुचविण्यात आले. पुनर्वापराचे थ्री-आर म्हणजे 'Reduce, Reuse, Recycle' यांसह 'Refuse' आणि 'Responsibility' असे दोन नवीन आर स्वीकारण्याचे सुचविले गेले.
चर्चासत्रात घरगुती धोकादायक कचऱ्याबद्दलही चर्चा करण्यात आली. ज्यात डायपर, सॅनिटरी कचरा, फिनाईलच्या बाटल्या, आदिंचा समावेश होतो. पण, याकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी, गंभीर आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो. कचरा व्यवस्थापनाबाबत 'NIMBI' सिंड्रोम म्हणजेच ‘Not in my backyard, माझ्या अंगणात नाही, या वृत्तीवरही चर्चा करण्यात आली. जिथे नागरिकांना स्वच्छ शहरे हवी असतात, कचरा योग्यरित्या व्यवस्थापित व्हावा अशी अपेक्षा असते, परंतु स्वतः काहीच करण्याची इच्छा नसते.
इंदौर मॉडेलवर प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकांनी चर्चा केली. तसेच कचरा समस्येवर नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
सदर कार्यशाळेत एव्हर एन्व्हायरो, कचरा ते सीएनजी प्रकल्पाचे सिध्दांत श्रीवास्तव, मुंबई वेस्ट मॅनेजमेंट आणि रिसस्टेनेबिल या आशियातील सर्वात मोठ्या बायोमेडिकल कचरा साईटचे सोमनाथ मालगर, सृष्टी वेस्ट प्रा. लि., इंदौर मॉडेलच्या धनश्री गुजर, इन्फोटेक सोल्युशन्स, बायोगॅस प्रकल्प गिरीश धुळप, ल्हास ग्रीन्स आणि समर्थ भारत गॅस, स्त्री मुक्ती संघटना, मेन्नोस एन्व्हायरोमेन्ट, रोटरी क्लब, आदिंच्या प्रतिनिधी सहभाग घेतला. यावेळी ठाणे महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी उपस्थित होते.