नवी मुंबईत आरोग्य, शिक्षण, रोजगार व्यवस्थेचे धिंडवडे
फ्री होल्ड नुसते निवडणुकी पूर्वीचे गाजर ... मनसेची टीका
नवी मुंबई :बेलापूर विधानसभेत मनसेच्या वतीने आरोग्य, शिक्षण, रोजगार या विषयांना केंद्रस्थानी ठेवून सलग दहा दिवस परिवर्तन यात्रा आयोजित केली होती. वाशी, तुर्भे, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सीवूड्स, बेलापूर, सीबीडी अशा भागात फिरत विविध समाज घटकातील लोकांशी मनसे प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी संवाद साधला.
नवी मुंबई मधील जमीन सिडकोने फ्री होल्ड केल्या आहेत अशा प्रकारचा जल्लोष सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केला आहे. या बाबत सिडकोच्या बैठकीत निर्णय झाल्याचे सांगितले जाते. निवडणुकीच्या तोंडावर कुचकामी शासन निर्णय काढून नवी मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसली जातील. गावठाण विस्तारातील घरे आणि व्यावसायिक जागा ही फ्री होल्ड मध्ये येणार का याबाबत अजूनही स्पष्टता नाही. अशा वेळी असा जल्लोष निवडणुकीच्या तोंडावर करणे हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे गजानन काळे यांनी म्हटले.
मागील अडीच वर्षे सत्ता असताना फ्री होल्ड बद्दल निर्णय का घेतला नाही ? आठवड्यात आचारसंहिता लागणार असल्याने निवडणुकीपूर्वी नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा हा प्रकार असल्याचे गजानन काळे यांनी सांगितले.
नवी मुंबईत बेलापूर सेक्टर १५, व दिवाळे गावातून जाणारा कोस्टल रोड यासाठी जवळपास ७० हजार झाडे तोडली जात आहेत. तसेच याने प्रकल्पग्रस्त मच्छीमार बांधवांचा मासेमारीचा व्यवसाय बुडणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला मनसेचा विरोध असल्याचे गजानन काळे यांनी स्पष्ट केले. बेलापूर मधील पोलीस वसाहतीची अत्यंत वाईट अवस्था आहे. वारंवार घरातील स्लॅब पडत आहेत. स्थानिक आमदारांनी जी घराची दुरुस्ती केली ती केवळ एका वर्षात निकृष्ट होती हे स्पष्ट झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून चांगल्या दर्जाची दुरुस्ती का करून देत नाही ? पोलिस वसाहतीतील पदपथ उखडले आहेत. उद्यानासाठी राखीव भूखंड अजूनही विकसित नाही केला. पोलिसांना राज्य सरकारने हक्काची घरे द्यावीत अशी मागणी यावेळी गजानन काळे यांनी केली. वाशी , नेरूळ, बेलापूर , मधील मनपा रुग्णालयात सुविधांचा बोजवारा उडाला असल्याचे दिसून आले. कुटुंब विस्तरापोटी वाढीव बांधकाम केलेली नेरूळ, वाशी, सानपाडा, बेलापूर मधील LIG घरे नियमित करा अशी मागणी मनसेने केली आहे.
टोल चालकांकडून वसुली कधीच झालेली असताना आता सुरू असलेली वसुली ही लूट आहे. त्यामुळे किमान नवी मुंबईतील MH ४३च्या वाहनांना वाशी आणि ऐरोली टोलमुक्त झालीच पाहिजेत अशी मागणी याप्रसंगी गजानन काळे यांनी केली. एपीएमसी विभागात कचऱ्याचे झालेले साम्राज्य, गळक्या छतांमुळे फळ मार्केट मधील व्यापारी, शेतकऱ्यांचे होत असलेले लाखोंचे नुकसान अशा अनेक विषयांवर परिवर्तन यात्रेने प्रकाश टाकला, अशी माहिती गजानन काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मनसेच्या या पत्रकार परिषदेत शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सह सचिव अभिजित देसाई, महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, शहर सचिव यशोदा खेडस्कर हे उपस्थित होते.