खारघरमध्ये मालमत्ता कर संकलन केंद्र सुरु

पनवेल : पनवेल महापालिका वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा देण्याच्या उद्देशाने १ऑक्टोबर रोजी खारघर मधील केंद्रीय विहार जवळील प्राईड इमारतीच्या तळमजल्यावर मालमत्ता कर संकलन केंद्राचे उद्‌घाटन आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, सहायक आयुक्त स्वरुप खारगे, प्रभाग अधिकारी स्मिता काळे, प्रभारी कर अधीक्षक सुनील भोईर, महेश गायकवाड, प्रभारी अधीक्षक जितेंद्र मढवी, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

मालमत्तांधारकांच्या बिलांमधील अडचणी लक्षात घेऊन, त्या सोडविण्यावर महापालिका मालमत्ता कर संकलन विभागाने भर दिला आहे. नागरिकांना कर भरणे सोपे जावे, त्यांच्या मालमत्ता कराच्या बिलामध्ये दुरुस्ती  व्हावी, तक्रारींचे निवारण लवकर व्हावे तसेच महापालिका मुख्यालयात येण्या-जाण्याचा वेळ वाचावा या उद्देशाने सदर मालमत्ता कर संकलन केंद्र सुरु करण्यात आले आहे.

मालमत्ता कर भरण्याची सुविधा यापूर्वी प्रभाग समितीमध्ये  देण्यात येत होती. परंतु, नागरिकांना अधिक सोयीचे व्हावे यासाठी सदर कर संकलन केंद्र सुरु करण्यात आले आहे. भविष्यात याठिकाणाहून अधिकाधिक सुविधा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच दर शनिवारी महापालिकेला साप्ताहिक सुट्टी असली तरी देखील मालमत्ता कराचे धनादेश स्वीकारण्याची सुविधा महापालिका मुख्यालयात सुरु करण्यात आली आहे. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी केले आहे. याचपध्दतीने आठवड्यातील कोणत्याही दिवशी धनादेशाने कर भरणा करणाऱ्यांसाठी ड्रॉप बॉक्सची सुविधा महापालिकेच्या वतीने लवकरच सुुरु करण्यात येणार आहे.

नागरिकांना ऑनलाईन मालमत्ता कर भरण्यासाठी  ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच panvelmc.org  या वेबसाईटवर जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येत आहे. लवकरात लवकर नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरुन महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे. याबरोबरच ऑनलाईन कर भरणा केल्यास २ टक्के सवलत देण्यात येणार आहे.

पनवेल महापालिकेचे प्रभाग अधिकाधिक सक्षम होण्यावर महापालिका भर देत आहे. मालमत्ता कर संकलन केंद्र सुरु झाल्याने खारघरवासियांना मालमत्ता कर भरणे सुकर होणार आहे. महापालिकेचा कारभार जास्तीत जास्त लोकाभिमुख व्हावा, पारदर्शक व्हावा, जबाबदार व्हावा यासाठी महापालिका तर्फे सातत्याने नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. नागरिकांनी महापालिकेने दिलेल्या सोयी-सुविधांचा लाभ घेऊन सहकार्य करावे. -मंगेश चितळे, आयुवत-पनवेल महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सन २०५५ पर्यंत ‘नवी मुंबई'ला ११७५ एमएलडी पाण्याची गरज