ठाणे महापालिकेचा ४२ वर्धापन दिन उत्साहात साजरा
ठाणे : ठाणे महापालिकेच्या निर्मितीपासून ते आजतागायत गेली ४२ वर्षे ठाणेकरांना विविध सोयी-सुविधा पुरवितानाच ठाणे शहराच्या विकासासाठी कटीबध्द राहून कार्य करणारी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ठाणे महापालिकेने नावलौकिक प्राप्त केला आहे. सदरचा नावलौकिक यापुढेही उंचावत राहण्यासाठी समर्पित भावनेने काम करणार असल्याचे प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
ठाणे महापालिकेचा ४२ वा वर्धापन दिन १ ऑक्टोबर रोजी राम गणेश गडकरी रंगायतन येथे महापालिका अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांना शुभेच्छापर मार्गदर्शन करताना आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे महापालिका राबवित असलेल्या लोकाभिमुख योजनांचा आढावा घेतला. याप्रसंगी अतिरिक्त आयुवत-१ संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त२ प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, उमेश बिरारी, मिनल पालांडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी चेतना नितिल, आदि उपस्थित होते.
ठाणे शहराचे बदलते स्वरुप, विकासाचे बदलते स्वरुप, राज्य तसेच देशाचे जे धोरण आहे त्याच्याशी सांगड घालून शहराचा विकास करणे महापालिकेचे कर्तव्य आहे. महापालिकेचे जे विविध विभाग आहेत, समाज विकास विभाग, पाणी पुरवठा, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्वच्छता या सर्व विभागांशी नागरिकांशी संबंध येत असतो. ठाणे बदलतयं.. स्मार्ट ठाणेकडे महापालिका नियोजनबध्द वाटचाल करीत आहे. १९८२ रोजी ठाणे महापालिकेची स्थापना झाल्यापासून ज्या पध्दतीने महापालिका काम करत आहे, त्याचपध्दतीने नवीन आव्हांनाचा स्वीकार करुन यापुढेही समर्पित भावनेने ठाणे महापालिका काम करीत राहणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी ठाणे महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या गणेशोत्सव आरास स्पर्धेतील विजेत्या मंडळांना आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक जय भवानी मित्र मंडळ ‘निष्काळजीपणामुळे होणारी जिवितहानी', तर द्वितीय क्रमांक महागिरी कोळीवाडा येथील एकविरा मित्रमंडळ यांनी साकारलेल्या ‘कैफियत समाधानाची' या देखाव्यास देण्यात आला. तृतीय गांधीनगर येथील शिवसम्राट मित्रमंडळ यांच्या ‘सुरक्षितता' या विषयावरील देखाव्यास, चैतन्य मित्र मंडळ, जिजामाता नगर सोसायटी (विविध प्रकारच्या नशेचे दुष्परिणाम) यांना चौथा, सार्वजनिक उत्सव मंडळ, जय भवानी नगर (ग्लोबल वॉर्मिंग) यांना पाचवा, ओम शक्ती विनायक मित्र मंडळ, गांधीनगर (युवा भारत) यांना सहावा क्रमांक मिळाला आहे. सातवा क्रमांक शिवगर्जना मित्रमंडळ (बटणाचा देखावा) आणि आठवा क्रमांक केदारेश्वर मित्रमंडळ, आनंदनगर (काळाप्रमाणे बदललेली माणसे) यांना देण्यात आला.
स्वच्छता अंतर्गत प्रथम क्रमांक सार्वजनिक उत्सव मंडळ-सावरकर नगर यांना, द्वितीय पारितोषिक ओंकारेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ-म्हाडा वसाहत, तर तिसरा क्रमांक स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमंडळ, सावरकर नगर यांना गौरविण्यात आले.
उत्कृष्ट मूर्तीकार म्हणून प्रथम पारितोषिक विनोद शिळकर (गुणसागरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ-कळवा), द्वितीय पारितोषिक राकेश घोष्टीकर (श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ), तृतीय पारितोषिक दिपक गोरे (कोलबाड मित्र मंडळ) यांनी पटकावले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटणकर यांनी केले.