नवरात्रोत्सवासाठी साहित्य खरेदी करण्याकरिता गर्दी

वाशी : उद्या ३ ऑवटोबर पासून  शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरु झाली असून, देवी मंदिरांमध्येही उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांचीही मंडप उभारणी आणि सजावटीची लगबग सुरु झाली आहे. टिपऱ्यांसह साहित्यांचा बाजार सजला आहे. दुसरीकडे दुर्गा मूर्तींच्या कामाला फार कमी कालावधी मिळाल्याने रंगरंगोटीची कामे दिवस-रात्र सुरु आहेत.

उद्या ३ ऑवटोबर पासून सुरु होणाऱ्या नवशक्तीच्या उत्सवाचे स्वागत करण्यासाठी नवी मुंबई शहर सजत आहे. शक्तीचे प्रतीक असणारा नवरात्र उत्सव नवी मुंबई शहरात उत्साहात साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने घरोघरी घटस्थापना करण्यात येते. नवरात्री उत्सव सुरु होण्यास एक दिवस शिल्लक राहिल्यामुळे बाजारपेठेत उत्सवासाठी लागणारे विविध साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. यामध्ये घटस्थापनेसाठी आवश्यक असणारी मडकी, घट, मुकुट, फेटे, दागदागिने, मंदिर, तोरण, झालर, परडी, नाडा, आकर्षक झुंबर, धान्य, माती, मातीचे दिवे आदी विविध साहित्य खरेदी करण्यास महिला प्राधान्य देत असल्याचे चित्र बाजारपेठ मध्ये दिसत आहे. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये साहित्याच्या किमतीत सुमारे १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली असली, तरी ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे. नवरात्र उत्सव सुरु होण्याआधीच बाजारात उलाढाल होण्यास सुरुवात झाली आहे. लाकडी टिपऱ्यांसह पारदर्शक फायबर टिपऱ्यांची विक्री अधिक आहे. आकर्षक कापडासह सजवलेल्या रंगीबेरंगी टिपऱ्या लक्ष वेधून घेत आहेत. विविध आकारात असणाऱ्या जाळीदार चुनरीला मागणी मोठी आहे.

अनेकजण घरीच दुर्गामातेची प्रतिष्ठापना करतात.त्यामुळे रात्री  उशिरापर्यंत रंगरंगोटीसह शेवटचा हात फिरवताना मूर्तिकार दिसत आहेत.तर काही घरात  मुखवट्याचे पूजन करतात. यासाठी आकर्षक, रंगबीरंगी मुखवटे बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. मुखवट्यासह लागणारे सर्व प्रकारचे दागिने, पेहराव विक्रीस असून, दागिने आणि आकर्षक पेहराव महिलांना भुरळ घालत आहेत. रंगीबेरंगी साडी, दागिने, नथ यासह तयार कम्बो सेटला मागणी वाढत आहे.

नवरात्रीसाठी बाजारात पूजा साहित्याची देखील दरवळ वाढली आहे. सुगंधित अगरबत्ती, धूप, कापूर, होमसाठी लागणारे साहित्य आदी साहित्य बाजारात पाहायला मिळत आहे.

नवरंगी साड्यांसह एकाच रंगाच्या साड्यांची क्रेझ
नवरात्री मध्ये नऊ दिवस नव रंगाच्या साड्या नेसण्याची क्रेझ काही वर्षांपासुन महिलांमध्ये वाढली आहे. त्यानुसार बाजारात नऊ रंगाच्या साड्यांचा कम्बो सेटच उपलब्ध झाला आहे. तर सध्या महिलांमध्ये सार्वजनिक कार्यक्रमासाठी एकाच रंगाच्या साड्या घेण्याची क्रेझ वाढत आहे. तसेच पारंपरिक पोशाखला देखील मागणी वाढली आहे. पुरुषांमध्ये देखील एकाच रंगाचे शर्ट, कुर्तीज घालण्याची आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे बाजारात महिलांसोबत पुरुषांच्या कपड्यांना मागणी वाढली असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले.

गावागावात असणारी गावदेवी सह कुलदैवत मंदिरात नवरात्रोत्सवात घटस्थापना केली जाते. त्यामुळे कुलदैवत मंदिरांना  देखील रंगरंगोटी सुरु झाली आहे. प्रत्येक गावात असणारी गावदेवीची मंदिरे तसेच प्रत्येक कुटुंबातील कुलदैवत मंदिराची सजावट, रोषणाई देखील सुरु झाली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे महापालिकेचा ४२ वर्धापन दिन उत्साहात साजरा