१० हजार विद्यार्थ्यांनी भरले रांगोळीत स्वच्छता रंग
नवी मुंबई : ‘स्वच्छता ही सेवा' मोहिमेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमातून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थी सहभागावर भर देण्यात येत असून नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता' अभियान अंतर्गत मुलांमध्ये जाणीव जागृती करण्यात येत आहे.
अशाच प्रकारचा स्वच्छताविषयक रांगोळी स्पर्धेचा आगळा उपक्रम महापालिकेच्या ५७ प्राथमिक आणि २३ माध्यमिक शाळांसह ३३३ खाजगी शाळांमध्ये राबविण्यात आला. ज्यामध्ये १०,४१० विद्यार्थ्यांनी सहभागी होत रांगोळीच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश प्रसारित केला. सहभागींमध्ये अर्थातच विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती.
रांगोळीच्या माध्यमातून कचरा वर्गीकरण, कचऱ्याची विल्हेवाट, प्लास्टिक प्रतिबंध, कापडी पिशव्यांचा वापर, स्वच्छतेचे महत्व असे विविध विषय विद्यार्थ्यांनी चित्रे तसेच संदेश रुपात साकारले. या देखण्या रांगोळ्यांनी शाळेतील पॅसेज सुंदर आणि अर्थपूर्ण रंगावलीने नटून गेला.
अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थी स्वकृती करीत अभियान मध्ये स्वच्छताविषयक जागरुकतेने सहभागी होत असून याद्वारे स्वच्छतेचा संस्कार करण्याचे उद्दिष्ट साध्य होताना दिसत आहे.