ॲडव्होकेट ॲकॅडमी-संशोधन केंद्र न्यायसंस्थेसाठी ठरणार मानचिन्ह -न्यायमूर्ती भूषण गवई

नवी मुंबई : देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या ‘ॲडव्होकेट ॲकॅडमी आणि संशोधन केंद्र'चा मुख्य भूमीपुजन सोहळा नेरुळ मधील डॉ. डी. वाय. पाटील विद्यानगर येथील टाऊन हॉल, सेंटर ऑफ एक्सलन्स येथे २८ सप्टेंबर रोजी संपन्न झाला.

याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई,  सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एस. गडकरी, न्यायमूर्ती नितीन सांबरे, महाराष्ट्र राज्याचे ॲडव्होकेट जनरल डॉ. बीरेंद्र सराफ, ‘गोवा'चे ॲडव्होकेट जनरल देविदास पंगम, ‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा'चे उपाध्यक्ष ॲड. सुदीप पासबोला, ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया'चे सदस्य ॲड. आशिष देशमुख तसेच नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, विधी-न्याय विभागाचे विधी सल्लागार तथा सहसचिव विलास गायकवाड, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, तिरुपती काकडे, महापालिका उपायुक्त डॉ.राहुल गेठे, विधी-न्याय क्षेत्रातील विविध नामवंत वकील, विधी शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.

देशातील पहिली ॲडव्होकेट ॲकॅडमी आणि संशोधन केंद्र वास्तू आपल्या महाराष्ट्रात होत आहे, याचा निश्चितच आनंद आहे. समाजात सामाजिक, आर्थिक समानता आणण्यासाठी सदर ॲकॅडमी महत्त्वाची भूमिका निभावेल आणि न्यायसंस्थेसाठी मानचिन्ह ठरेल, असा विश्वास न्यायमूर्ती भूषण गवई यांनी प्रमुख मार्गदर्शनात व्यवत केला.

या देशातील सर्वसामान्यांना वेळेत न्याय मिळण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील असायला हवे. न्यायव्यवस्थेने सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय मान्य केला आहे. त्यादृष्टीने आपण न्याय क्षेत्रात काम करायला हवे. सामाजिक, आर्थिक विषमता दूर करणे, आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. सुदृढ सक्षम समाज घडविण्यासाठी सामाजिकदृष्ट्या वकिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सदर ॲकॅडमी उत्कृष्ट वकील घडविण्यासाठी मोलाची भूमिका निभावणार आहे, असे सांगून न्यायमूर्ती गवई यांनी या ॲकॅडमीतून सामाजिक, आर्थिक क्रांती निर्माण करणारे वकील घडावेत, नामवंत वकिलांनी या ॲकॅडमीत आपले ज्ञानरुपी योगदान द्यावे, असे आवाहन केले.

कार्यपालिका, विधीपालिका आणि न्यायपालिका या व्यवस्था एकमेकांना पूरक, सहाय्यकारी व्यवस्था आहेत. सदर व्यवस्था अधिक सक्षम होईल यासाठी न्यायिक क्षेत्रातील सर्वांनी प्रयत्नशील राहायला हवे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने ॲडव्होकेट ॲकॅडमी आणि संशोधन केंद्राची वास्तू लवकरच पूर्ण होईल, असे न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले.

शासनाच्या सहकार्यातूनच राज्यात नागपूर, औरंगाबाद आणि मुंबई येथे लॉ युनिव्हर्सिटी साकारल्या जात आहेत. नागपूर येथील ‘लॉ युनिव्हर्सिटी'चे काम पूर्ण झाले असून तेथील कॅम्पस्‌ जागतिक स्तरावरील कॅम्पस बनले आहे. ‘मुंबई लॉ युनिव्हर्सिटी'चेही काम लवकरच सुरू होणार आहे. या ॲकॅडमीसाठी जागा देण्याची कार्यवाही अत्यंत जलद गतीने केल्याबद्दल शासनाचे आभार मानून ते पुढे म्हणाले की, विविध ठिकाणी बेंचेसची नव्याने स्थापना करण्याचा निर्णय न्यायव्यवस्थेला उपयुक्त ठरणार आहे. मंडणगड सारख्या ग्रामीण भागात न्यायालय स्थापन करुन ‘भारतीय संविधान'चे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा खऱ्या अर्थाने सन्मान करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

चांगले कायदे बनविण्यासाठी ‘ॲकॅडमी'ची निश्चित मदत - ना. फडणवीस
देशातील पहिली ॲडव्होकेट ॲकॅडमी महाराष्ट्रात साकारली जात आहे, याचा निश्चितच आनंद आहे. शासनाने या ॲकॅडमीसाठी जागा दिली आहे. समाजाच्या दृष्टीने आणि शासनासाठीही ॲकॅडमी उपयुक्त ठरेल, यात शंका नाही. या ॲकॅडमीच्या माध्यमातून न्यायदानाच्या क्षेत्रात उत्तम काम होईल. चांगले कायदे बनविण्यासाठी ॲकॅडमीची निश्चित मदत होईल. न्यायदानाचे क्षेत्र वेगाने बदलत आहे. या क्षेत्रातही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरु झाला आहे. कोव्हीड काळात सुप्रीम कोर्टाच्या पुढाकाराने ऑनलाईन न्यायदानाचे उत्तम कार्य पार पडले. त्यामुळे या क्षेत्रातील पारदर्शकता वृध्दींगत झाली. नुकतेच उच्च न्यायालयाच्या इमारतीचे भूमीपुजन झाले, तर आज ॲडव्होकेट ॲकॅडमी आणि संशोधन केंद्राचेही भूमीपुजन संपन्न झाले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्रब भुजबळ यांनी मनोगतातून सांगितले.

अलिकडच्या काळात शिका...विसरा आणि पुन्हा शिका... अशी अभ्यासाची आधुनिक पध्दत सर्वत्र रुजत आहे. या बदलत्या काळात अशा प्रकारची ॲकॅडमी न्याय क्षेत्रासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. ॲडव्होकेट ॲक्ट सुधारित करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. या क्षेत्रात येणाऱ्या नवीन वकिलांसाठी विद्यावेतन देण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे सांगून या ॲकॅडमीच्या माध्यमातून निश्चित चांगले काम होईल, असा विश्वास ना. फडणवीस यांनी व्यक्त केला.

‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा'चे अध्यक्ष ॲड. संग्राम देसाई यांनी या ॲकॅडमीसाठी नवीन वकील, माजी न्यायाधीश, नामवंत वकील मंडळी आपले योगदान नक्कीच देतील, असा विश्वास व्यक्त केला.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. शमिता यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड.सुदीप पासबोला यांनी केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

किल्ले दुर्गाडी लगतच्या प्रस्तावित डीपी रस्त्यामधील बांधकामांवर निष्कासनाची  धडक कारवाई !